Thursday, November 14, 2019

शहरात डेंग्यूचे थैमान, आतापर्यंत ११ जणांचा घेतला बळी

४६ पॉझिटिव्ह तर १११ संशयीत रुग्ण

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात डेंग्यूच्या साथीने चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. मंगळवारी दोघांचा मृत्यु झाल्यामुळे डेंग्यूच्या बळींची संख्या ११ वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढत असताना मनपाकडून मात्र प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.१३) तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

शहरात ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ सुरु झाली असलीतरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह ४६ तर संशयीत १११ रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या ११ वर पोहचली आहे. डेंग्यूने संपूर्ण शहराला विळखा घातला असून घराघरात साथरोगाचे रुग्ण आढळून येत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष

डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या संपर्क अधिकाऱ्यांनी आठ दिवस मोहिम राबवण्यास सहकार्य केले. त्यानंतर संपर्क अधिकारी झोन कार्यालयाकडे फिरकले देखील नाही. आयुक्तांनी आदेश देवूनही संपर्क अधिकाऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले नाही.

अ‍ॅबेटिंगची मोहिम कागदावरच

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आकडेवारी पाहिल्यास आठ तासात एवढया घरांमध्ये ही मोहिम राबवली जाणे शक्य नाही. तरीदेखील घराघरात जावून अ‍ॅबेटिग केल्याचे कागदोपत्रीच दाखवले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यां धरले धारेवर

शहरात डेंग्यूने दोघांचा बळी घेतल्याचे कळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेंग्यूची साथ सुरु असतांनाही प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात नाही. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे  डेंग्यूची साथीचा प्रकोप वाढतच चालला आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाही का? असा सवाल महापौरांनी केला. खासगी रुग्णालयातील संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसलेतर त्या रुग्णांचा परवाना निलंबित करा, डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, त्याचा दररोजचा अहवाल सादर करावा असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले.

भिमनगर, भावसिंगपूरा, ज्योतीनगर रेड झोनमध्ये

डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. 
जागतिक मधुमेह दीना निम्मित
N8 बोटॅनिकल गार्डन मध्ये
मोफत शुगर checkup
व आरोग्य तपासणी.
N8 बोटॅनिकल भारतीय योगा व हेडगेवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ( 14 नोव्हेंबर) सकाळी 6 ते  8 या वेळेत मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेे. 
 या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर विकास रत्नपारखी हे मधुमेहींची तपासणी करून मार्गदर्शन केले,    Kailash जाधव यांचे भारतीय योग संस्थां ,   अमित जाजू यांचे जयहिंद ग्रुप,  सिडको , N- 8 , बॉटनिकल गार्डन , डॉ. अरविंद गुजराथी यांचे योगासन ग्रुप, व परिसरातील सर्व नागरिक उपस्तीत होते.
रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन बंद

एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
एमआयएमच्या स्विकृत नगरसेवकाने कचरा संकलक रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.१४) शहरातील कचरा संकलनाचे व वाहतूकीचे काम बंद करुन कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, कचरा संकलनासाठी वाहनांना पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. बुधवारी आमखास मैदानाजवळ छोटया वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्विकृत नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यानंतर क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाश्मी यांनी या अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक कचरा संकलन बंद केले. रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारीही कचरा संकलनाचे काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. सकाळपासूनच सर्व प्रभागातील कचरा संकलन वाहतूकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात कचऱ्यांचे ढीग साचले होते. कर्मचारी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा यासाठी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर मनपा मुख्यालयात येवून कर्मचाऱ्यांनी वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत कचरा संकलन केले जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, महापालिका प्रशासन कचरा संकलन व वाहतूकीचे काम सुरु करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कात होते. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
*सदस्य औद्योगिक न्यायालय अभय लाहोटी यांचे मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन  तर्फे स्वागत*

औरंगाबाद दि.१४ नवंबर-जळगाव येथील औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांचे औरंगाबादत कँम्प औद्योगिक न्यायालय म्हणून रूजू झाल्याबद्दल मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले.

याबाबत असे की औरंगाबाद येथे अतिरिक्त औद्योगिक न्यायालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशनची होती. ती मागणी मजूंर होऊन अतिरिक्त न्यायालयाचा कक्ष गेल्या काही महिन्यांपासून सज्ज होता. पूर्णवेळ न्यायाधीशांची नेमणूक होईपर्यंत जळगाव येथील सदस्य औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांना महिन्याच्या पहिल्या व तिसरा आठवड्यात औरंगाबाद येथे कॅम्प औद्योगिक न्यायालय म्हणून जबाबदारी मिळाली व त्यांनी औरंगाबादेत न्यायादानाचे कार्य सुरूही केले.मराठवाडा लेबर प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या परंपरे प्रमाणे नविन आलेल्या न्यायाधीश श्री अभय लाहोटी यांचे स्वागत व सत्कार असोसिएशनच्या कार्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.रविंद्र शिरसाठ हे होते. कार्यक्रमाच्या सूरूवातीस कँम्प औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रविंद्र सिरसाठ यांनी केले. सदस्य औद्योगिक न्यायालय श्री आर.आर.काकाणी यांचे स्वागत असोसिएशनचे सचिव अॅड सागरदास मोरे यांनी, कामगार न्यायालय श्री डी व्ही जोशी यांचे स्वागत अॅड राजेश खंडेलवाल यांनी ,तर कामगार न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांचे स्वागत अॅड अशोक मोरे यांनी केले. यावेळी वकीलांच्या वतीने अॅड अभय टाकसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कॅम्प न्यायालय श्री अभय लाहोटी यांना जलद गतीने निकाल देण्यासाठी वकीलातर्फे पुर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन देत न्यायाधीशांकडून पक्षकारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्च व सर्वोच्च न्यायालयात चागंला वकील द्यायचा असल्यास किमंत मोजावी लागते ती कामगारांची ऐपत नसल्याने खालच्या न्यायालयात काम मिळालाच पाहिजे ही जबाबदारी वकील आणि न्यायाधीशांची असते असे प्रतिपादनही अॅड अभय टाकसाळ यांनी केले. यावेळी संचलन व प्रास्ताविक अॅड सचिन गंडले यांनी केले तर आभार प्रदर्शन असोसिएशन चे सेक्रेटरी अॅड सागर दास मोरे, यांनी केले. अॅड रविंद्र सिरसाठ यांनी अध्यक्षीय समारोप करताना असोसिएशन ला जागेची कमतरता आहे त्याबद्दल सदस्य औद्योगिक न्यायालय यांनी योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी विनंतीही केली .यावेळी चहापानाचा कार्यक्रम ही झाला बार व बेंच यांचे चांगले संबंध हे न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान करीत असतात ही परंपरा औरंगाबादला अबाधित असल्याचेही सिरसाठ म्हणाले. सर्व वकीलांनी नूतन न्यायाधीशांना स्वताःचा परिचय करून दिला यावेळी अॅड एम पी टाकसाळ, अॅड जे एस भोवते, अॅड सिटी एल मुळावेकर, अॅड भगवान भोजने,अॅड रविंद्र सिरसाठ, अॅड एस के वाघचौरे, अशोक मोरे, अॅड सागरदास मोरे, अॅड आर के ढगे पाटील,अॅड अनिल सुरवसे,अॅड राजेश खंडेलवाल, अॅड बाबासाहेब वावळकर,अॅड आनंद कांबळे, अॅड सपना तांगडे, अॅड. एस एल नामेवार,अॅड इ एम रामटेके अॅड अभय टाकसाळ, अॅड सचिन गंडले यांच्यासह मोठया संख्येने वकील बंधू भगिनीं उपस्थित होते.
आैरंगाबादेत डेंग्यूसाठी हायअलर्ट

अकरा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग

आैरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात आतापर्यंत अकरा जणांचे बळी घेऊन थैमान घातलेल्या डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी अबेटिंग व फुर फवरणीची मोहीम प्रभावीवणे राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या भागात आराेग्याबाबतची आणीबाणीही (हायअलर्ट) लागू करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

आैरंगाबाद शहरात मागील दाेन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून डेंग्यूमुळे आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. नगरसेवकांनी डेंग्यूबाबत महापालिका काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेनंतर महापाैरांच्या दालनात मलेरिया विभागाच्या अतिरिक्त अधिकारी डाॅ. अर्चना राणे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. शहरात आतापर्यंत १३६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बुधवारी एका दिवसात वाढ झालेल्या २५ रुग्णांचाही समावेश आहे. त्यातील ४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डाॅ. राणे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी आराेग्य प्रमुख अधिकारी डाॅ. भटकर यांच्याशी फाेनवरून संपर्क साधत कर्मचारी वाढवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या. तर डाॅ. भटकर यांनी ३६ कर्मचारी देण्यात येतील, असे महापाैरांनी सांगितले.

डाॅ. अर्चना राणे यांनी महापाैरांपुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. त्यात सध्या १५० कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र आकृतीबंधानुसार आराेग्य विभागाकडे २०४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनपाचे ८४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात मलेरिया शास्त्रज्ञ हे पद रिक्त आहे. प्रत्येक वाॅर्डसाठी प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. धूरफवारणीसह गप्पी मासे साेडण्यासाठी २ कर्मचारी असल्याची माहिती डाॅ. राणे यांनी महापाैरांना दिली. आतापर्यंत अबेटिंग गाेळ्यांचे वाटप शहरातील ४ लाख घरांपर्यंत झालेले असून आणखी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचण्याची व्यवस्था करण्याची सूचना महापाैरांनी केली. डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी प्रसंगी शहरात आराेग्य आणीबाणीही जाहीर करण्याची तयारी मनपाने केली असल्याचे महापाैर घाेडेले यांनी सांगितले.

आयुक्त सुट्टीवर ; महापौर घोडेलेंची एकतर्फी लढाई

शहरात डेंग्यूने हाहाकार माजलेला आहे. आतापर्यंत ११ बळी गेलेत. या परिस्थितीला महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे प्रमुख मनपा आयुक्त निपुण विनायक यांना याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे अधोरेखित होत आहे. दिवाळीपासून रजेवर गेलेले आयुक्त अद्यापही शहरात परत आलेले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णवेळ आयुक्त द्या असे पत्रच महापौरांनी राज्यपालांना दिले आहे. महापौर नंदकुमार घोडेले आरोग्य विभागाच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. मात्र, प्रशासनाचा प्रमुख शहराला वाऱ्यावर सोडून सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आयुक्ताविना महापालिका ; जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश मिळेना

मनपा आयुक्त कोण ? महापौर घोडेले यांचा संतप्त सवाल

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीपासून सुट्टीवर गेल्याने काही दिवस जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला होता. मात्र, विनायक यांनी पुन्हा परस्पर रजा वाढवल्याने सध्या त्यांचा पदभार कोणाकडे सुपुर्द करण्यात आला याची माहिती मनपाला देण्यात आलेली नाही, एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सुधारित आदेश प्राप्त नसल्याचे सांगितल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त कोण? असा संतप्त सवाल महापौर घोडेले यांनी केला.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दिवाळीनिमित्त दहा दिवसाच्या सुटीवर गेले. आयुक्त सुटीवर गेल्यामुळे त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा आठ दिवसाची सुटी वाढवली. या वाढवलेल्या कालावधीसाठी आयुक्तांचा प्रभारी पदभार देण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत समोर आले. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार असल्याने महापौरांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र पाठवले. सकाळी दहा वाजता बैठक सुरु होण्यापूर्वी महापौर घोडेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना बैठकीला यावे अशी सूचना केली. त्यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, आयुक्तांनी वाढविलेल्या सुटीच्या काळातील प्रभारी पदभार स्विकारण्यासंदर्भात कोणतेही आदेश   प्राप्त झालेले नाही, असे महापौरांना सांगितले. त्यांनतर महापौर घोडेले यांनी राज्याचे मुख्यसचिव अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी फोनव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोघांनीही फोन घेतला नाही. त्यामुळे महापौर घोडेले संतप्त झाले. मनपाचे आयुक्त कोण? असा सवाल त्यांनी केला.

प्रशासकीय प्रमुखही महापौरच ?

शहरातील रखडलेल्या कामांसाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या दालनात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस उपायुक्तांसह विभागप्रमुख उपस्थित होते. शंभर कोटीच्या रस्ता कामांचा आढावा घेतला. सिटीचौक ते सादिया टॉकीज पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सूरूवात होणार आहे. रस्त्यांची कामे करण्यासाठी चारही ठेकेदारांनी लॅब सुरु केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांची जमा असलेल्या अनामत रकमेतून प्रत्येकाचे अडीच लाख रूपये घेवून दहा लाख रूपयात लॅब उघडणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विशेष म्हणजे ही बैठक आयुक्ताविनाच पार पडली.


महापालिकेचा प्रशासकीय कारभार ठप्प

आयुक्तांच्या कार्यालयात प्रशासकीय मान्यतेसाठी अनेक महत्त्वाच्या संचिका पडून आहेत.  स्मार्ट सिटीतून होणारी स्मार्ट वॉटर, हेल्थ, ऐतिहासिक दरवाजे, रस्ते, शाळा या कामांच्या निविदा प्रक्रिया ठप्प आहे. घनकचरा प्रकल्पाचा सुधारित १४३ कोटीचा आराखडयास शासनाने मंजूरी दिली. त्याला मनपाची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. मात्र, अजूनही आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. हर्सुलची नव्याने निविदा काढण्यात आलेली नाही. उपभोक्ता कर लावण्याची निविदा काढण्यात आली नाही. मालमत्तांचे सर्वेक्षण करुन नव्याने कर लावला गेला नाही. मालमत्ता आणि घनकचरा विभागाचे अधिकारी बैठकीस नसल्याने मनपाच्या प्रशासनाची घडी विस्कळीत झाल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 
भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात ;
एक जण ठार दोन जण जखमी

औरंंगाबाद/प्रतिनिधी
समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जखमी झाले. हा अपघात गुरूवारी (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिकलठाणा गावाजवळ घडला. या अपघातात कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या हा देखील जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण नामदेव चव्हाण (वय २५,रा. म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना) असे मयत तरूणाचे नाव आहे. संजय शिवाजी चव्हाण (वय ३०,रा.म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना), शेख रईस उर्फ बोक्या (रा.गरमपाणी परिसर, औरंगाबाद) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. श्रावण चव्हाण व संजय चव्हाण हे दोघे पडेगाव परिसरात राहणार्‍या बहिणीला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी आले होते. बहिणीला भेटून श्रावण चव्हाण, संजय चव्हाण हे दोघे परतुरला जात असतांना, त्यांना शेख रईस उर्फ बोक्या हा भेटला. त्यानंतर तिघेही दुचाकीवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने परतुरकडे जात होते.
दरम्यान, चिकलठाणा गावाजवळील पुलावर समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी चालविणार्‍या श्रावण चव्हाण याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला जावून आदळली. या अपघातात तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावण चव्हाण, संजय चव्हाण यांना उपचारासाठी घाटीत हलविले असता डॉक्टरांनी श्रावण चव्हाण याला तपासून मयत घोषीत केले. हा अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शेख रईस उर्फ बोक्या याने घटनास्थळावरून धुम ठोकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------------------

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...