Thursday, November 14, 2019

शहरात डेंग्यूचे थैमान, आतापर्यंत ११ जणांचा घेतला बळी

४६ पॉझिटिव्ह तर १११ संशयीत रुग्ण

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात डेंग्यूच्या साथीने चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. मंगळवारी दोघांचा मृत्यु झाल्यामुळे डेंग्यूच्या बळींची संख्या ११ वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढत असताना मनपाकडून मात्र प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.१३) तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

शहरात ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ सुरु झाली असलीतरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह ४६ तर संशयीत १११ रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या ११ वर पोहचली आहे. डेंग्यूने संपूर्ण शहराला विळखा घातला असून घराघरात साथरोगाचे रुग्ण आढळून येत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष

डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या संपर्क अधिकाऱ्यांनी आठ दिवस मोहिम राबवण्यास सहकार्य केले. त्यानंतर संपर्क अधिकारी झोन कार्यालयाकडे फिरकले देखील नाही. आयुक्तांनी आदेश देवूनही संपर्क अधिकाऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले नाही.

अ‍ॅबेटिंगची मोहिम कागदावरच

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आकडेवारी पाहिल्यास आठ तासात एवढया घरांमध्ये ही मोहिम राबवली जाणे शक्य नाही. तरीदेखील घराघरात जावून अ‍ॅबेटिग केल्याचे कागदोपत्रीच दाखवले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यां धरले धारेवर

शहरात डेंग्यूने दोघांचा बळी घेतल्याचे कळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेंग्यूची साथ सुरु असतांनाही प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात नाही. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे  डेंग्यूची साथीचा प्रकोप वाढतच चालला आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाही का? असा सवाल महापौरांनी केला. खासगी रुग्णालयातील संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसलेतर त्या रुग्णांचा परवाना निलंबित करा, डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, त्याचा दररोजचा अहवाल सादर करावा असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले.

भिमनगर, भावसिंगपूरा, ज्योतीनगर रेड झोनमध्ये

डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. 

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...