Sunday, December 30, 2018

मराठवाड्यातील लाखो रुग्णांना मृत्यूच्या मुखातून खेचून जीवनदान देणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे घाटी! या दवाखान्याने कधी गरिबीला हिनवले नाही; की कधी श्रीमंतीच्या पायाखाली लोळण घेतली नाही. रुग्णांची सेवा करणे हाच या घाटीचा एकमेव उद्देश होता आणि आहे! काळ लोटला तसा या वास्तूत आणि येथील प्रशासनामध्ये अनेक स्थित्यंतरे होत गेले.  वर्तमानपत्रात घाटी प्रशासनाचा भोंगळ कारभार  उघडा तर  पडत गेलाच पण इमारतीचा, प्रशासनाचा, तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणींचा शोध घेण्याचा खटाटोप 'मराठवाडा साथीच्या' रिपोर्टर्सने केला आहे. त्याचाच हा लेखाजोखा...!

 ---------------------

 प्रसूतीपूर्व महिलांचे आरोग्य जपणे फार महत्वाचे असते.
मागील दोन दिवसांपासून प्रसूतीपूर्व कक्षात पाणी नाही. पाणी टंचाईची ही अडचण नेहमीचीच आहे. कधी नळ तोडलेला असतो तर कधी टाकीत पाणी सोडले जात नाही. आम्ही वेळोवेळी प्रशासनास कळवले आहे. परंतु पाण्याचा प्रश्न काही संललेला नाही. पाण्याअभावी पुरेशी स्वछता राखण्यास अडचणी येत आहेत. -डॉ.श्रीनिवासन गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख

-------
 स्वछतागृहांची ऎशी की तैशी..!


घाटी रुग्णालय मराठवाड्यात उपचाराच्या केंद्रस्थानी आहे. कित्येक गंभीर रोगांवर या ठिकाणी उपचार केला जातो. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) ची आजची परिस्थती खूप बिकट झालेली आहे. रुग्णालयात कुठे स्वछतागृहांची चाळण झालेली दिसते तर कुठे दुर्गंधीने स्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. रुग्णालयात अपघात विभाग हा रुग्णांनी कायम गच्च भरलेला असतो .  विभागात रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाची शुश्रूषा केली जाते खरी परंतु ;  येथे स्वछतागृहाची राखरांगोळी झालेली आहे. स्वछतागृहाचा मुख्य दरवाजा तुटलेला आहे. तर आतील परिसरात वैद्यकीय कचरा टाकलेला  आहे. कित्येक महिने स्वछतागृहांची व्यवस्थित स्वछता न झाल्यामुळे आतील पांढऱ्या टाईल्सवर काळा थर जमला आहे. सर्जिकल मेल वॉर्ड मध्ये टिश्यू पेपर आणि तुटलेल्या खुर्च्या टाकलेल्या आहेत. तर बाल कक्षामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने फेकून दिलेले अन्न बघायला मिळते. पाण्याची व्यवस्थाही पुरेशी नाही. दरवाजाचे कोपरे धुम्रपाणाच्या थुंकीने लाल भडक झालेले आहेत.

-------








बेड नसल्याने रुग्ण फरशीवर


रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात रुग्ण जास्त आणि बेड कमी आहेत. बेड अभावी  रुग्णांना फरशीवर झोपावे लागत आहे. रुग्णांना घाटी प्रशासनाकडून एक गादी दिली जाते. ही गादी फरशीवर टाकून थंडीच्या दिवसात रुग्णांना खाली झोपावे लागत आहे. दरम्यान फरशीवर झोपलेल्या रुग्णाला रक्त पुरवठा करायचा असल्यास किंवा ऑक्सिजन वा सलाईन वाटर ची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करण्यास मोठे अवघड होऊन बसले आहे. यामध्ये  रुग्णांच्या जीवाशी तर खेळले जात आहेच. त्यापेक्षाही शुश्रूषा करताना डॉक्टरांच्या नाकीनऊ येत आहेत.

एका वार्डात जवळपास 45 रुग्णांची सेवा शुश्रूषा केली जाऊ शकते. प्रसूती पूर्व कक्षात 45 बेड आहेत तर तपासणीसाठी आलेल्या गरोदर माता 85 च्या घरात असतात. शल्य चिकित्सा विभागाचीही परिस्थिती सारखीच आहे.
     घाटी प्रशासनास याबद्दल विचारले असता वैद्यकीय अधीक्षक कैलास झिने यांनी हे शासकीय रुग्णालय असल्यामुळे येथे गरीब तसेच श्रीमंत रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. येथे बेड कमी आहेत. रुग्णांची संख्या मात्र जास्त झाली आहे. आपण रुग्णांना येऊ नका असे तर म्हणू शकत नाही. आम्ही नवीन बेड साठी मागणी केली आहे.लवकरच बेड येतील असे त्यांनी सांगितले.

-----

नवीन 200 बेड येणार

  वाढते रुग्ण आणि कमी बेडची स्थिती पाहता रुग्णालयाने माता व बाल सुरक्षा विभागाने राष्ट्रीय स्वास्थ्य अभियानांतर्गत 38.5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याअंतर्गत नवीन इमारतीचा प्रस्ताव मान्य केलेला असून  आराखडा देखील मंजूर झालेला आहे. या अभियानांतर्गत नव्या इमारतीसोबत 200 नवीन बेड येणार आहेत. नवीन इमारतीचा आराखडा तीन महिने आधी मंजूर झालेला असून सामान्य जनता तसेच प्रशासन इमारत सत्यात कधी उतरणार याची वाट पाहून आहेत.


--

ऑक्सिजन सिलेंडर ठेवायचे कुठे ?

रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजन सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासाठी जम्बो सिलेंडर तसेच गरजेनुसार मिनी सिलेंडरचा वापर केला जातो.  रुग्णालयात दिवसभरात गरजेनुसार 30 ते 35 जम्बो सिलेंडर तर 8 ते 10 मिनी सिलेंडर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लागतात. हैराण करणारी गोष्ट म्हणजे हे सिलेंडर  तळमजल्यावर असलेल्या रिकाम्या व्हरांड्यात ठेवण्यात येत आहेत. रिकामे झालेले आणि भरलेले ऑक्सिजन सिलेंडर  यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. जम्बो सिलेंडर यांचे वजन जास्त आहे. रुग्णाची ने आन करताना किंवा नातेवाईकडून हे सिलेंडर पडल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या अडचनी संदर्भात सखोल चौकशी केली असता असे आढळून आले की, ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी रुग्णालयात पुरेशी जागा नाही. सद्यस्थिला 20 × 20 ची खोली आहे. येथे फक्त छोटे सिलेंडर ठेवता येऊ शकतात. मोठ्या जम्बो सिलेंडरसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.

-----


कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबावा म्हणून शासनाने 19 ऑक्टोबर 2006 रोजी महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, तसेच सरकारी दवाखाने अशा ठिकाणी विशाखा समिती असणे बंधनकारक केले आहे. तसेच  विद्यमान  समितीतील अध्यक्ष, सदस्य यांची नावे कार्यालयात फलकाद्वारे किंवा बॅनरद्वारे लिहिलेले असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे पीडित महिलेला विशाखा समितीतील सदस्यांशी वेळीच संपर्क साधता यावा.


---------------

घाटीमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचावर आळा घालण्यासाठी विशाखा समिती आहे. परंतु विद्यमान अध्यक्ष कोण आणि सदस्य कोण हे कळायला मार्ग नाही. विशाखा समितीमधील अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक असलेले एकूण दोन बोर्ड पाहायला मिळतात.  एका समितीत डॉ. सईदा अफरोज विशाखा समितीच्या अध्यक्षा असल्याचे दाखवण्यात आलेले  आहे  तर दुसऱ्या बॅनरवर डॉ.सीव्ही दिवाण अध्यक्षा यासल्याचे नमूद आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीही अध्यक्षा निवृत्त झालेल्या आहेत. विद्यमान अध्यक्षा डॉ. रेक्षाकिरण शेंडे या आहेत. परंतु त्यांच्या नावाचा कुठेही लवशेष नाही. दोन्ही बोर्डमधील अध्यक्षा व सदस्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून विचारले असता कुनाची बदली झालेली आहे तर कुनि निवृत्त झालेले आहे. तर कुणी "मी आता विशाखा समितीची सदस्या नाही. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. मी बाहेरगावी आहे. मी कॉन्फरन्स मध्ये आहे. अशा प्रकारची उडवा-उडवीची उत्तरे मिळाली.
   या सर्व सावळ्या गोंधळात. एखाद्या महिला कर्मचाऱ्याशी अभद्र व्यवहार झाला तर तिने कुणाशी संपर्क साधावा ? विद्यमान  अध्यक्षांना कुठे शोधावे ?  पीडित महिलेने कुणाकडे तक्रार करावी ? हे प्रश्न मात्र  अनुत्तरित आहेत.

------

घाटित कचराकुंड्यांची कमतरता ?

रुग्णालयात जागोजागी कचरा फेकलेला आहे. पहिल्या मजल्यावर कचराकुंड्याऐवजी कॉन्सन्ट्रेटेड हिमोडायलेसिस सोल्युशनचे रिकामे डब्बे वापरण्यात येत आहेत. तलमजल्यावर सोल्युशनचे असे दहा ते बारा रिकामे डब्बे आढळले. यात डॉक्टरांनी वापरलेले मास्क, हॅन्डलोव्ह, रुग्णांच्या नातेवाईकांनी आणलेले खाद्यपदार्थ डब्यात टाकलेले आढळले. एकीकडे स्वछतागृहांत पडलेला कचरा पाहायला मिळतोय तर दुसरीकडे कचराकुंड्याचा अभाव आहे.  हे चित्र म्हणजे घाटी प्रशासन  सुस्त असल्याचे द्योतक आहे की,   घाटी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे प्रतीक आहे हे कळायला मार्ग नाही.

----------

घाटीच्या स्वछतेचा वाली कुठे गेला..?


घाटी परिसरात स्वछता राहावी म्हणून  स्वछता देखभालीसाठी स्वछता निरीक्षक नावाचे पद आहे. त्याचा अखत्यारीत घाटातील सर्व सफाईचे नियोजन केले जाते. परंतु मागच्या 12 महिन्यांपासून येथे स्वछता निरीक्षकाचे पद रिकामे आहे. स्वछता निरीक्षकाच्या कक्षात सफाई कामगार जेवण करतना तसेच गप्पा मारताना हमखास पाहायला मिळतात. रुग्णालय सफाईचा अतिरिक्त भार टेंकाळे यांनी सांभाळला. टेंकाळे यांच्याकडे मुख्यत्वे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सफाईची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. दहा महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात वापस बोलावून घेण्यात आले.
  याविषयी अधिक माहिती विचारण्यासाठी  वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.कैलास झिने यांच्याशी दूरध्वनी तसेच प्रत्यक्षात जाऊन संपर्क साधला असता अधिकची माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडून घ्या म्हणून सांगितले. तर अधिष्ठाता  डॉ.कानन येळीकर यांना याबाबत विचारले असता आम्ही वेळोवेळी डीएमईआर शी पत्रव्यवहार करतो आहोत. सहा महिने झाले आम्ही वरिष्ठांना कळवले आहे असे उत्तर त्यांनी दिले. अधिकची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.कैलास झिने देतील असे सांगून प्रश्नाला डावलण्याचा प्रयत्न केला. या डावलाडावलीच्या  खेळात   स्वछता निरीक्षकाच्या रिकाम्या असलेल्या जागेमुळे घाटिमधील पसरलेल्या  अस्वछतेचे साम्राज्य लपवता  मात्र येणार नाही हे तितकेच खरे आहे.

---------

अधिष्ठाता उवाच....!

 प्रश्न :- शासकीय रुग्णालयातील स्वछता निरक्षकाची जागा रिकामी का आहे ?
उत्तर :- हो. ही जागा रिकामी असल्याचे मी वेळोवेळी डीएमईआरला  कळवले आहे.

प्रश्न :- तोपर्यंत कुणाकडे जबाबदारी सोपवलेली होती ?
उत्तर :- शेवाळे यांनि काही काळ काम पाहिले. नंतर त्यांना पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात स्वछता निरीक्षक म्हणून वापस बोलावले गेले.

प्रश्न :- मिनी घाटीमुळे आपलयावरील ताण कमी झाला आहे का ?

उत्तर :- असे तर वाटत नाही.

प्रश्न :- प्रत्येक वॉर्डामध्ये कचरा आहे. तसेच स्वछतागृहांची परिस्थिती खूप वाईट आहे. असे का ?

उत्तर :- याबद्दल मला जास्त माहिती नाही. मी तिकडे जास्त जात नाही. डॉ.कैलास झिने त्या भागाची रोज पाहणी करतात. त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळेल.

-------

वैद्यकीय अधिष्ठाता उवाच ..!

प्रश्न :- जळीत कक्ष, अपघात कक्षातील  खुर्च्या, टिश्यू पेपर, तसेच वैद्यकीय कचरा स्वछतागृहांत  टाकलेला आहे. असे का ?

उत्तर:- मास्क, सिरिंज,  तसेच इतर कचरा स्वछतागृहात टाकला जात नाही. तुम्ही पाहिलेले फिनाईल असू शकते.

प्रश्न :- अपघात विभाग वगळता दुसऱ्या कुठल्याही वार्डात कॅमेरा का नाही ?

उत्तर :- बऱ्याच ठिकाणी कॅमेरे आहेत. दुसऱ्या वार्डात पेशन्ट असतात. नातेवाईक असतात त्यामुळे तेथे कॅमेरे नाहीत. आम्हाला ज्या ठिकाणी नजर ठेवणे आवश्यक वाटते त्या ठिकाणी आम्ही कॅमेरे लावलेले आहेत.

प्रश्न :- पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील स्वछतागृहे ब्लॉक झालेले आहेत. ते दुरुस्त कधी होणार ?

उत्तर :- वापर जास्त झाल्यामुळे ही अडचण निर्माण होते. ब्लॉकेज होणे , दुरुस्ती होणे या गोष्टी चालूच असतात. आम्ही दुरुस्ती करत आहोत.

प्रश्न :- पहिल्या मजल्यावरील लिफ्ट बंद आहे. दुरुस्ती साठी काही हालचाली ?

उत्तर :- काही लिफ्ट बंद आहेत. काही चालू आहेत. आम्हाला आवश्यक वाटणाऱ्या लिफ्ट बिघडल्या तर आम्ही त्या तातडीने दुरुस्त करून घेतो. आमच्याकडे फंड उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही कामे करू शकत नाही. रुग्णांना औषध देण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत; दुरुस्ती खूप लांबची गोष्ट आहे.


प्रश्न :- बेड ची कमी आहे  का आहे ?

उत्तर :- आपल्याकडे रोज 60 ते 70 डिलिव्हरी रोज होतात. 30 ते 40 सिझर होतात. शासकीय रुग्णालय असल्यामुळे आपण कुणाला येण्यापासून थांबवू शकत नाही. बेड कमी आणि पेशन्ट जास्त असल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे.


प्रश्न :-या अडचणींवर मात करण्यासाठी आपली काही भूमिका ?

उत्तर :- आम्ही वरती पैशांची मागणी केली आहे. पैसे मंजूर झाले आहेत. लवकरच अडचणी मार्गी लागतील.


------------------------

घाटीची सुरक्षा खिळखिळी

डॉक्टरवर हल्ला , उपकरणांची तोडफोड अशा प्रकारच्या घटना घाटी रुग्णलयात हमखास घडतात. समाज कंटकांकडून  डॉक्टरांना शिवागीळ होणे हा तर इथला रोजचाच प्रकार आहेत. यावर कुठेतरी लगाम लागावा म्हणून वैद्यकीय अधिष्ठाता यांचा दालनात कॅमेऱ्यांची फौज रुग्णालयावर नजर ठेवताना  दिसली. मात्र हे सर्व कॅमेरे घाटी परिसराबाहेर आहेत किंवा वॉर्ड बाहेर आहेत. बहुतांश वार्डामध्ये कुठलाही कॅमेरा नाही. जळीत कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिचिकित्सा कक्ष या वार्डातही कॅमेरे नाहीत. सुरक्षा रक्षक बाहेरच्या आवारात पाहायला मिळाले. मात्र डॉक्टरांवर हल्ला झाला किंवा वॉर्डामध्ये तोडफोड झाली तर सबळ पुराव्याअभावी आरोपी  पकडला जाणे शक्य होणार नाही.



मेटल डिटेक्टर सहा महिन्यांपासून बंद

अपघात विभागाजवळ असलेला मेटल डिटेक्टर सहा महिन्यापासून बंद आहे. रूग्णालयात कोण येत आहे ? कशासाठी येत आहे ? त्याच्याजवळ काही स्फोटके आहेत का ? काही शस्त्र आहे का याची तपासणी करण्यासाठी बाहेर मेटल डिटेक्टर लावलेले आहे. परंतु वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंद पडलेले आहे. परिणामी सुरक्षा रक्षकांची दमछाक तर होत आहेच. परंतु डॉक्टरांचे प्राण, ईतर कर्मचाऱ्यांचा  जीव याची कुठलीही शास्वती येथे नाही.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...