Tuesday, March 5, 2019

मनपा मुख्यालय येथील प्रबोधनकार सीताराम ठाकरे सभागृह येथे महिला व बालकल्याण समिती यांच्या तर्फे रिस्पॉन्सीबल नेटिझम बद्दल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा सभापती महिला बालकल्याण समिती श्रीमती माधुरी अदवंत,मा मुख्यलेखापरिक्षक श्रीमती दिपराणी देवतराज , मा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, महिला बालविकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे, मा शिक्षण अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी,आहान फाउंडेशन व रिस्पॉन्सीबल नेटिझम तर्फे श्री उन्मेश जोशी, श्री विजय देशमुख ,श्री आशिष शिंदे ,व मनपा शाळेच्या 200 विद्यार्थी ,शिक्षक ,अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिस्पॉन्सीबल नेटिझम म्हणजे इंटरनेटवर केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेऊन जबाबदारीने वागणारे व त्याचा वापर करणारे व लहान मुले व किशोरवयीन मुली व मुले ,महाविद्यालयीन मुले मुली पालकवर्ग यांच्यामध्ये या आभासी गटातील धोक्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व मानसिक आरोग्य सांभाळून इंटरनेटवर जबाबदारीने कसे वागायचे यासाठी इंटरनेटचा वापर करताना किशोरवयीन व महाविद्यालयीन मुले ,मुली ,पालक व शिक्षक याना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे .लहान मुले ,तरुण तरुणी किंवा या वयोगटातील व्यक्तींना इंटरनेट जगाचे अत्यंत आकर्षण वाटते पण त्यातील धोक्याची त्यांना जाणीव नसते त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे.या धोक्यापासून संरक्षण करण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
तसेच महिलांना मोफत संगणक ओळख असे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मेगाप्रो कॉम्पुटर, सुयश कॉम्प्युटर, कहार कॉम्प्युटर, अक्षरा कॉम्पुटर,वर्ल्ड इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर या संस्थेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी अमृत फाउंडेशन यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप,चिवडा,शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की वाटप करण्यात आले .
शिवसेनेला मिळणार पालिकेतील सत्तेत वाटा!

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याने आता पुणे महापालिकेत सेनेला सत्तेचा वाटा मिळणार आहे. तशी मागणीच शिवसेनेने सत्ताधारी भाजपकडे केली असून, उपमहापौरपदासह एक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदांची मागणीही केली आहे. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व सेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले. त्यात भाजपने पालिकेत एकहाती सत्ता मिळविली, तर सेनेचे केवळ दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सेनेला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले होते. आता मात्र निवडणुकीसाठी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचा अर्ज भरण्यासाठी सेनेने हजेरी लावली होती. आता यापुढे जाऊन सेनेला थेट सत्तेत वाटा हवा आहे.
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले आहे. त्यात पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद, एक वर्षासाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद, चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद आणि एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद अशा विविध पदांची मागणी केली आहे. आता नक्की कोणती पदे सेनेला मिळणार यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट आणि सेनेचे संपर्क नेते, खा. संजय राऊत आणि संपर्कप्रमुख बाळा कदम हे लवकरच एकत्र बैठक घेऊन घेणार आहेत.
दरम्यान, भाजपनेही सेनेला सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली असून, उपमहापौरपद आणि काही विषय समित्यांची अध्यक्षपदे सेनेला सोडली जातील, असे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

सहकार कायद्याचे उल्लंघन; राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष, मानद सचिवांवर कारवाई

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादितची वार्षिक सभा सहा महिन्याच्या आत न बोलविणे आणि आर्थिक वर्ष समाप्तीनंतर चार महिन्याच्या आत लेखापरीक्षण करून न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील व मानद सचिव विद्याताई पाटील यांना एक वर्षांसाठी सहकारी संस्थेचा अधिकारी म्हणून किंवा समितीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडला जाण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले आहेत.तसेच संघाचे सचिव एस. ई. वायाळ यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला आहे. याकामी पुढील कामकाजासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) आनंद कटके यांची नियुक्ती आयुक्तांनी केली आहे. 
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये  नोंदणी झालेली संस्था आहे. या अधिनियमातील कलम ७५(१) च्या तरतुदीप्रमाणे वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीत लेखापरीक्षण करून न घेतल्याने आणि वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत सदस्यांच्या अधिमंडळाची वार्षीक बैठक न बोलविल्यामुळे सहकार कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. तसेच संघाच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीप्रमाणे ही जबाबदारी  संघाचे अध्यक्ष  डॉ. प्रताप पाटील, मानद सचिव विद्याताई पाटील  समिती सचिव एस. ई. वायाळ यांची असल्याने सहकार आयुक्तांनी तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी समक्ष लेखी व तोंडी म्हणणे मांडले आहे. मात्र, अध्यक्ष, मानद सचिव आणि समिती सचिवांचा दिलेला खुलासा सहकार आयुक्तांनी अमान्य करीत ही कारवाई केली आहे. 
याबाबत संघाचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, १० एप्रिल २०१८ रोजी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली. संघाच्या सेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी ४ जुलै २०१८ पासून पुढे १११ दिवसांचा संप केला. त्या पदाधिकाऱ्यांना संघात उपस्थित राहून कामकाज करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे लेखापरीक्षण वेळेत पूर्ण झालं नाही आणि सभेसाठी प्राधिकृत अधिकारी नेमण्याचे पत्र दिल्याने नोटीस मागे घ्यावी. मात्र, हा खुलासा आयुक्तांनी अमान्य केला आहे.   
याबाबत सहकार आयुक्त सोनी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, सहकार संघाची वार्षिक सभा वेळेवर न घेतल्याने अध्यक्ष, मानद सचिवाना एक वर्षांसाठी अपात्र करण्याची कारवाई केली आहे, तसेच सचिवांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Stem Cells च्या मदतीने दूर केला HIV! भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वातील टीमचे यश, अंतिम निष्कर्श बाकी...

18 महिन्यांपासून रुग्णात HIV चे जिवाणू नाहीत, अशा स्वरुपाचा दुसरा प्रयोग

लंडन - ब्रिटनमध्ये स्टेम सेल्सच्या मदतीने एका एचआयव्ही रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आला आहे. उपचार होऊन 18 महिने झाले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत या रुग्णाच्या शरीरात एचआयव्हीचे जिवाणू सापडलेले नाहीत. यासोबतच एचआयव्हीच्या औषधींची सुद्धा त्यांना गरज पडलेली नाही. असे असले तरीही संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरा झाल्याचे सांगता येणार नाही असे संशोधकांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय वंशाचे वैज्ञानिक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) चे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीमने हा प्रयोग केला आहे.


संशोधकांनी म्हटले हा प्रयोग अद्यापही परीपूर्ण नाही
> गेल्या 18 महिन्यांपासून संबंधित रुग्णाला एचआयव्हीच्या औषधी घ्याव्या लागल्या नाहीत. त्याच्या शरीरात या व्हायरसचे चिन्ह सुद्धा सापडले नाहीत. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, तरीही तज्ज्ञांनी तो पूर्णपणे बरा झाला किंवा नाही यावर सांगणे घाई असेल असे स्पष्ट केले. ज्या रुग्णावर स्टेम सेल्सच्या मदतीने उपचार करण्यात आले तो एक पुरुष असून लंडनचा रहिवासी आहे. त्याला 2003 मध्ये एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले होते. 2012 मध्ये त्याला हॉजकिन्स कॅन्सर झाला. कॅन्सरवर उपचार करत असताना कीमोथेरेपी करण्यात आली होती. यासोबतच, एका निरोगी व्यक्तीचे स्टेम सेल्स रुग्णाच्या शरीरात इंप्लांट करण्यात आले होते. या उपचाराने त्याचा कॅन्सर आणि एचआयव्ही हे दोन्ही रोग थांबले आहेत. शरीरात या रोगाची चिन्हे सुद्धा सापडत नाहीत.
> अशा पद्धतीने उपचार केल्याची ही दुसरी वेळ आहे. बर्लिनचा रहिवासी टिमोथी ब्राउनवर पहिला प्रयोग झाला होता. त्याला एचआयव्ही एड्स आणि ल्युकेमिया अशा दोन तक्रारी होत्या. रेडिओथेरेपी आणि स्टेम सेल्स वाढवून त्याच्या शरीरात इंप्लांट करण्यात आले. त्याच्या शरीरातून सुद्धा एचआयव्हीचे जिवाणू नष्ट झाले. आतापर्यंत ज्या दोन रुग्णांवर प्रयोग करण्यात आला ते दोघेही एचआयव्हीसह दुसऱ्या एका रोगाने बाधित होते. अशात फक्त एचआयव्ही असलेल्या रुग्णावर हे उपचार कसे काम करणार याची शाश्वती देता येणार नाही. सोबतच, त्या दोन्ही रुग्णांवर संशोधक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर उपचार अजुनही संपलेले नाहीत.


भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वातील टीमचे यश
लंडनमध्ये झालेला प्रयोग युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इम्पेरियल कॉलेज लंडन, केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ अशा नामवंत इंस्टिट्युटच्या संशोधकांनी केला. तर या संपूर्ण टीमचे नेतृत्व भारतीय वंशाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता करत होते. ते युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये संशोधक आहेत. हा प्रयोग अंतिम नसला तरीही यातून संशोधकांना या दुर्धर आजारावर उपचाराची दिशा आवश्य मिळाली आहे अशी प्रतिक्रिया आणखी एक संशोधक प्रोफेसर एड्वार्डो ओलाव्हेरिया यांनी दिली आहे.
औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ, वादाचे चित्रीकरण करणार्‍या पत्रकारांना धक्काबुक्की

राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादातून कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ झाला. वादाचे चित्रिकरण करणार्‍या पत्रकारांना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की केली. हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादातून दोन गटात धक्काबुक्की झाली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली औरंगाबादेतून मूक मोर्चाला सुरुवात झाली होती.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली सकल मराठा समाज एकत्र आला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून मराठा समाज संघर्ष करत आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन मिळाले आहे. प्रत्यक्षात कृती झालेली नाही.

राज्यात एकूण 58 माेर्चे काढण्यात आले. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका ठरवण्यात येणार आहे. मराठा बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Monday, March 4, 2019

मोटारसायकल चोरटे सिडको पोलिसांकडून जेरबंद

औरंगाबाद/प्रतिनिधी : सिडको भागात मोटारसायकल चोरणाऱ्या भामट्याना पोलिसांनी गजाआड केले. कारवाईत आरोपींकडून पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मंगेश गिरी, धानोरा ता.गंगापुर जि.औरंगाबाद, सुमीत रामचंद्र राजपुत रा-एन-6, सिंहगड कॉलनी औरंगाबाद आणि एक विधीसंघर्ष बालकाला सिडको पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको भागात मोटारसायकल चोरीतील फरार आरोपी मंगेश गिरी  बिव धानोरा ता. गंगापूर येथे शेतात लपून बसला आहे, अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोउनि सी.व्ही ठुबे, पोहेका, दिनेश बन पोना संतोष
मुदीराज, पोशि ईरफान खान यांनी बिव धानोरा ता.गंगापुर जि.औरंगाबाद मंगेश गिरीला त्याच्या शेतातुन सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार सुमीत रामचंद्र राजपुत रा. एन-6, सिंहगड कॉलनी औरंगाबाद याला घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांनी सिडको हद्दीतुन चार मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

सिडको पोलीस स्टेशन हद्दीत पोउपनी बी.के.पाचोळे , पोहेका नरसिंग पवार, राजेश बनकर, पोना प्रकाश
डोगंरे, पोशि सरेश भिसे किशोर गाडे, स्वप्निल रत्नपारखे, विजय भानुसे गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिगं करीत असताना त्यांना एक विधीसंघर्ष बालक मोटारसायकल वर जाताना आढळला. त्याला मोटरसायकल व कागदपत्रे
याविषयी विचारपुस केली असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर त्याने मोटर सायकल ही चोरी केलेली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तीन आरोपीकडुन २ लाख ५० हजारांचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपीकडुन आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे व त्याचे
ईतर साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप- आयुक्त राहुल खाडे, सहा पोलीस आयुक्त गुणाजी सांवत, वरीष्ट पोलीस निरीक्षक अशोक गिरी याचे मार्गदर्शनाखाली पो. उपनि. सी.व्ही.ठुबे, बी.के.पाचोळे, पोहेका, दिनेश बन, नरसिंग पवार ,राजेश बनकर ,पोना संतोष मुदीराज, प्रकाश डोंगरे, प्रकाश भालेराव, पोशि ईरफान खान, राजु सुरे, सरेश भिसे, किशोर गाडे, स्वप्निल रत्नपारखे, विजय भानुसे यांनी केली.
*पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षे कैद*

*मुंबई : -* पत्रकारांवर  वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र  विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले आहे.

यानुसार आता पत्रकार वा माध्यमानंतर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोंन्हीही, अशी शिक्षा होणार आहे.
 तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.
महाराष्ट्र प्रसारमाध्यमांतील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा  हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे.
 विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मजूर करण्यात आले आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...