Thursday, November 14, 2019

धनादेश अनादरप्रकरणी उद्योगपतीला अटक

औरंंगाबाद : दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेले साईराम इंडस्ट्रीचे मालक सिध्दार्थ बागूल (रा.श्री.स्वामी समर्थ कॉलनी, सिडको महानगर) यांना गुरूवारी (दि.१४) गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. धनादेश अनादर प्रकरणी बागुल यांच्याविरूध्द मुंबईतील माझगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, जमादार गरड,भालेराव, बिडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------------------
यंत्रावर काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू

औरंंगाबाद : यंत्रावर काम करीत असतांना अचानकपणे यंत्राचा मार लागून सुभाष लक्ष्मण म्हस्के (वय २२, रा.धोंडखेडा) या कामगाराचा मृत्यू झाला. सुभाष म्हस्के हा गुरूवारी (दि.१४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयसीएल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे त्याच्या डोक्याला यंत्राचा जोरदार धक्का लागून तो बेशुध्द झाला. सुभाष म्हस्के याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.
----------------------------------------
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंंगाबाद : गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे राहणार्‍या शिला गोरख तिनगोटे (वय २४) या महिलेने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिला तिनगोटे हिने गुरूवारी (दि.१४) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिला तिनगोटेला उपचारासाठी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
सातार्‍यात तीन दुकाने फोडून ४० हजाराचा मुद्देमाल लंपास

औरंंगाबाद/प्रतिनिधी
बीडबायपास लगत सातारा परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडून जवळपास ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड बायपास रोडवरील हुसैननगरातील रहिवासी शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल (वय ३८) यांचे हुसैननगर परिसरात किराणा सामानाचे दुकान आहे. ९ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्यांनी शेख अबुलखैर अहेमद यांचया दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील किराणा सामान, इतर जिवनावश्यक वस्तू, रोख रक्कम असा एकूण २३ हजार २३० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांच्या दुकानाजवळील सय्यद मंसुरी बापूजी यांच्या दुकानातून  ७ हजार ४२० रूपये किंमतीचा तर मोहम्म्द दानीश एकबाल अंन्सारी यांच्या दुकानाचे शटर उचकटून ८ हजार ४०० रूपये किंमतीचा असा एकूण ३९ हजार ५० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी एकाच रात्रीत एक किराणा दुकान, पानटपरी आणि डेली निड्स शॉप अशी तीन दुकाने फोडल्यामुळे सातारा परिसरातील रहिवाश्यांत खळबळ उडाली आहे. शेख अबुलखैर सलिम अहेमद उर्फ अखिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सानप करीत आहेत.
डेंग्यूचा धोका कायम ; पुन्हा 46 रुग्णांची भर पडल्याने महापालिकेची चिंता वाढली

औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरात डेंग्यूने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे 85 रूग्ण आढळले होते. महिन्याच्या शेवटी पाच दिवस डेंग्यूच्या पॉझीटिव्ह रूग्णांचा आकडा स्थिर होता. त्यामुळे पालिकेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, या महिन्यात 11 दिवसात डेंग्यूचे 46 रुग्ण आढल्याचे सोमवारी (दि.11) समोर आले. यावरून शहरात अजूनही डेंग्यूचा धोका कायम असून परिणामी महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या साथीने चांगलाच जोर पकडला आहे. तरीही ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे केवळ 8 रूग्ण आढळले होते. संशयितांचा आकडा हा 99 इतका होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात एकदमच 22 रूग्णांचे रिपोर्ट डेंग्यू पाझीटिव्ह आले. तर सुमारे 200 रूग्ण संशयित आढळले. मात्र, मनपा आरोग्य विभागाने डेंग्यूची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या नव्हत्या. दरम्यान डेंग्यूचा पहिला बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली आणि आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास आरोग्य विभागाने सुरू केल्या. ऑक्टोंबर महिन्यात पंधरा दिवसांतच सात जणांचा डेंग्यूने बळी घेतला. तेव्हा पालिका आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात शहरातील बहुतांश भागात डेंग्यू डासांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने ही साथ रोखण्यासाठी जलदतेने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या. अ‍ॅबेटींग विशेष मोहीम सुरू केली. याअंतर्गत ऑक्टोंबर महिन्यात जोखमीच्या भागात जाऊन डोअर टू डोअर सर्वेक्षण, डास उत्पत्तीच्या स्थानांची तपासणी, पाण्याचे कंटेनर्स तपासण्यात आले. अ‍ॅबेट वाटप, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन, औषध व धूरफ वारणी अशा विविध उपाययोजना पालिकेच्या आरोग्य विभागाने राबविल्या. मात्र यानंतरही आक्टोबर महिन्यात तब्बल 85 जणांना डेंग्यूची लागण झाली, तर 382 संशयित आढळले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून सोमवार (दि.11) पर्यत अकरा दिवसांतच डेंग्यूचे तब्बल 46 रूग्ण आढळले आहेत. संयशित रूग्णांचा आकडा मात्र या तुलनेत कमी 99 एवढा आहे. यामुळे अद्यापही डेंग्यूची साथ अटोक्यात आलेली नाही. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

दहा वर्षांचे रेकॉर्ड मोडले

डेंग्यूच्या साथीची मागील दहा वर्षांतील आकडेवारीनुसार यावर्षी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्यासाथीने कहर केला आहे. 2016 मध्ये डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावर्षी डेंग्यूच्या रूग्णांची वर्षभरातील संख्या 100 होती, तर संशयित 277 रुग्ण आढळले होते. मात्र, वर्ष संपायला अजून एक महिना बाकी असताना डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण 174 तर संशयित तब्बल 791 आढळले आहे. मागील दहा वर्षांतील हा उच्चांक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई- मुकेश सारवान

औरंगाबाद/प्रतिनिधी
महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी (दि११) दिला.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी महापालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त मंजूषा मुथा, सहायक आयुक्त विक्रम दराडे, पल्लवी घाटगे, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे, विटेकर यांच्यासह बहुजन कामगार शक्ती महासंघाचे  संजय रगडे, अशोक हिवराळे, कैलास जाधव, पंडित दाभाडे, वाल्मिक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माजी नगरसेवक संजू रिडलॉन, हुशारसिंग चव्हाण, मुकेश लव्हेरा, सामाजिक कार्यकत्र्या चंदा राजपूत आदींची उपस्थिती होती. या बैठकीत महापालिकेतील सफाई कामगारांच्या अडअडचणी जाणून घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी पगार, बोनस वेळेवर मिळत नाही, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतल्या जात नाही, अशा तक्रारी केल्या. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाड समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याची तक्रार केली. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. काम करताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही सहकार्य केले जात नाही. अशा तक्रारीही कर्मचाऱ्यांनी केल्या.

त्यांनतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मुकेश सोन सारवान म्हणाले, मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींचा व समस्यांचा आढावा घेतला. प्रशासनाने सकारात्मक भुमिका मांडली. लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन किमान १ तारखेला देण्यात यावे, हंगामी-कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार पदोन्नती देण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील घरे मालकीहक्क नावे करुन देण्यात यावे, समाजमंदिरात मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना केल्या असल्याचे सारवान यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सारवान यांनी दिला. तसेच तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेवून प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल असे सारवान यांनी सांगितले.

व्यापारी संकुलात गाळे राखीव

सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगाराकरिता मनपाच्या व्यापारी संकुलातील एक गाळा राखीव ठेवावा असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

सफाईच्या कामांचे कंत्राट देण्यास प्राधान्य

शहरातील सफाई कामांचे कंत्राट देण्यासाठी वाल्मिकी, मेहत्तर, सुदर्शन समाजाच्या संस्था, संघटनांना प्राधान्य देण्यात यावे, या समाजाचे जिवनमान उंचविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लागले ती मदत करावी अशा सूचना सारवान यांनी प्रशासनाला केल्या.
मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये महापालिकेचे १ कोटी ४२ लाखाचे नुकसान ; लेखा परिक्षण अहवालात प्रकार उघड

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीमधील ६० प्रकरणामध्ये चुकीच्या पध्दतीने कर वसुली करण्यात आल्यामुळे १ कोटी ४२ लाख ५५ हजार रुपयाचे महापालिकेचे नुकसान झाल्याचा प्रकार लेखा परिक्षण अहवालात समोर आला आहे. २०१७-१८ या वर्षाचे लेखा परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये हे आक्षेप नोंदवण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (दि.११) सांगितले.

महापालिकेतील मुख्य लेखा परिक्षण विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर विभागाचे लेखा परिक्षण केले. या लेखा परिक्षणामध्ये मालमत्तेचा कर वसुल करताना अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. एकूण प्रकरणांपैकी ६० प्रकरणांमध्ये आक्षेप नोंदविण्यात आले असून मालमत्ता कराची वसुली करताना व्यावसायिक कराची वसुली निवासी कर आकारुन करण्यात आली. तसेच रेडीरेकनर दरानुसार कर आकारणी करताना त्यामध्ये दराची जुळवणी होत नाही. त्यामुळे कर कमी प्रमाणात वसुल झाला आहे. एकूण कर वसुलीमध्ये १ कोटी ४२ लाख ५५ हजार ७५९ रूपये इतके नुकसान झाले असून हे नुकसान वसुल करण्यासाठी कार्यवाही करावी, रक्कमेतील हा फरक वसुल करावा अशी सूचना लेखा परिक्षणात करण्यात आली आहे. संबंधित मालमत्ताधारकांकडून कमी भरण्यात आलेला कर वसुल केला जाणार आहे.

१८ हजार मालमत्ताच्या दुबार नोंदी

मालमत्तांचे नामांतर करतांना वॉर्ड कार्यालयात फस्ट पार्टी ते थर्ड पार्टी अशी नोंद करण्यात आल्यामुळे दुसऱ्या पार्टीचे नाव नसल्यामुळे मनपाचे उत्पन्न बुडाले आहे. अशा १८ हजार मालमत्ताधारकांची दुबार नावांची नोंद असल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे आता टॅक्स पावती एकच देण्यासाठी आणि दुबार नावे टाळण्याकरिता स्वतंत्र अ‍ॅप तयार केले जाणार आहे.

सर्व विभागाचे ऑडीट होणार

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालय, उद्यान, जलतरण, जाहिरात, वटले न गेलेले धनादेश, बॅकेतील ठेवी, यांत्रिकी, जुनी वाहने यासह प्रत्येक विभागाचे लेखा परिक्षण केले जाणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.
देगाव येथे चोदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार....
गटविकास अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

नायगाव ता.प्रतिनिधी - तालुक्यातील देगाव येथील सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामे बोगस व कागदोपत्री दाखवून निधी तर हडपलाच पण बोगस लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रुपये शौचालयाचे अनुदानही लाटल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण ग्रामसेवक हे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबुक यादीतील असल्याने सदरच्या अर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
       नायगाव तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतला मागच्या चार वर्षात तब्बल ५० लाखाची रक्कम १४ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाली आहे. पण सरपंच पद लिलावात घेतलेल्या सरपंच सौ. जयश्री सुरेश मोरे व ग्रामसेवक सुर्यकांत बोंडले यांनी संगणमताने निधीची विल्हेवाट लावली आहे. प्राप्त निधीतून सौरदिवे, रेती, गिट्टी, ढबर, बारकी गिट्टी, सिमेंट, मजूरी यावरच मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्षात कुठलेच काम करण्यात आले नाही. गरोदर माता पोषण आहार, पाणी पुरवठा साहित्य खरेदी,संगणक खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी अदिंच्या बनावट पावत्या जोडण्यात आल्या. अपंगासाठी १३४००० एवढा निधी खर्च केल्याचे दाखवण्यात आले पण अपंगाच्या पदरात काहीच पडले नाही. मागासवर्गीय वस्तीतील स्मशानभूमीत बांधकाम, डब्ल्यू बी एम करणे, सीसी रोड, दगड, सोलींग, शाळेला वाल कंपाऊड बांधल्याच्या कामाच्या बोगस मोजमाप पुस्तीका बनवण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंगणवाडीत दिड लाखाचे साहित्य खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे पण प्रत्यक्षात तिथे काहीच नाही.
      देगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दि. ३ सप्टेंबर २०१८ रोजी २ लाख २४ हजार ५४० रुपये खर्चून आर ओ बसवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे पण तिथे सध्या परिस्थिती साधे पाणी सुध्दा उपलब्ध नाही. त्याचबरोबर २९ मार्च २०१९ रोजी ३ लक्ष ८३ हजार ६०० रुपये खर्चून गावात विद्युतीकरण करण्यात आले आहे. मात्र संध्याकाळी गावात रस्ता शोधाव लागतो. याती अनेक कामे बोगस तर करण्यात आलीच आहेत पण काही कामे फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली. अशाप्रकारे सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने शासनाचा निधी हडप केल्याने गावची अवस्था भकास झालेली आहे.
     त्याचबरोबर गावातील बोगस लाभार्थ्यांच्या नावावर संगणमताने शौचालय अनुदानाचे लाखो रुपये हडपण्यात आले आहेत. १४ व्या वित्त आयोगासह शौचालय अनुदानाची रक्कम हडप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करुन तक्रारदारा़च्या उपस्थितीत सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषी सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख आरिफ व माधव बैलकवाड यांनी २१ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली होती. पण देगावचा ग्रामसेवक हा गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबूक यादीतील असल्याने चौकशीच्या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...