Tuesday, December 10, 2019

आयुक्तांचे स्वागत नगरसेविकेलाही पडले महागात
फोटो-युवा सामना मिडिया न्युज नेटवर्क औरंगाबाद.

आयुक्तांसमोर जातांना जरा विचार करून जावे, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दबक्या आवाजात चर्चा

प्लास्टिक पॅकिंगमध्ये पेन आणल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड

औरंगाबाद / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (दि.9) पदभार घेताच प्लास्टीक कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणलेल्या नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. याची चर्चा थांबत नाही तोच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.10) भाजपच्या नगरसेविकेलाही आयुक्तांनी दणका दिला. गिफ्ट देण्यासाठी प्लास्टीक कव्हरमध्ये पेन आणलेल्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनाही 500 रूपये दंडाची पावती फाडावी लागली. यामुळे पालिकेत आता चुकीला माफी नाही हे आयुक्तांनी कृतीतून दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्यात प्लास्टीक बंदीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अस्तिककुमार पाण्डेय यांनी आयुक्तपदाची सूत्रे हातात घेताच प्लास्टीक बंदीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. प्लास्टिक वापरताना कोणी निदर्शनास आले तर स्वतः आयुक्त त्यांना दंड आकारत आहे. सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी पुष्पगुच्छ घेवून आयुक्तांचे स्वागत करण्यास त्यांच्या दालनात जात होते. दरम्यान, नगररचना विभागाचे सहायक संचालक आर. एस. महाजन हे आपल्या सहकार्‍यांसह आयुक्तांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून पुष्पगुच्छ घेवून गेले. प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून आणलेले पुष्पगुच्छ समोर येताच आयुक्तांनी त्यांना पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला. त्यानुसार महाजन यांच्याकडुन जागेवर दंडही वसुल केला. याची चर्चा थांबत नाही तोच मंगळवारी सकाळी भाजपच्या नगरसेविकेला प्लास्टीक वापराचा दंड भरावा लागला. भाजपचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा नगरसेविका मनिषा मुंडे यांनी आयुक्तांना पेन गिफट केला. मात्र हा पेन प्लास्टिक गिफ्ट पेपरमध्ये पॅकींग करून आणला होता. त्यावर प्लास्टीकचे कव्हर असल्याचे दिसताच आयुक्तांनी आपल्या स्वीय सहायकांना बोलावून मुंडे यांना 500 रूपये दंडाची पावती दिली. तसेच दंडही वसूल केला. या प्रकारामुळे आता पालिकेत नियम डावलून काम करणाऱ्यांना माफी नाही अशी जोरदार चर्चा प्रशासकीय इमारतीत सुरू होती.

अखेर थकीत बिलांसाठी 68 दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेले ठेकेदारांचे मनपा आयुक्तांना निवेदन

औरंगाबाद /शहर बातमी-
शहरात केलेल्या विकासकामांच्या थकित बिलांच्या मागणीसाठी ठेकेदारांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा सोमवारी (दि.9) 68 वा दिवस होता. नवनियुक्त आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी सोमवारी सकाळीच पदभार घेतला. यावेळी ठेकेदारांनी आयुक्तांना निवेदन देत थकित बिले देण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी तूर्तास आंदोलन करणार्‍या ठेकेदारांची बिले देण्याचे नियोजन करतो, असे आश्वासन दिल्याने आयुक्त पांडे यांच्याकडून ठेकेदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मनपा तिजोरीत खडखडाट असल्याने ठेकेदारांची सुमारे अडीचशे कोटी रूपयांची बिले थकली आहेत. उसने पैसे घेऊन, कर्ज काढून विकासकामे केली आहेत. मात्र बिले थकल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून छोट्या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. आजपर्यंत पालिका पदाधिकारी, प्रशासनाने ठेकेदारांना तोंडी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बँक खात्यावर पैसे पडत नाही तोपर्यंत साखळी उपोषणही सुरू ठेवण्याचा निश्चय ठेकेदारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी नवनियुक्त आयुक्त पांडे रूजू झाले. त्यानंतर पालिका मुख्यालयात पाहणी करत असतानाच त्यांना ठेकेदारांनी निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी बिले देण्यासंदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा करून व्यवस्था करतो, असे आश्वासन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबनराव हिवराळे यांनी सांगितले. याप्रसंगी पीएम कन्स्ट्रक्शनचे परशुराम पाथरूट, शेख मुजाहेद, आतिक पालोदकर, गुलाब रसूल, सुरेश डोईफोडे, प्रकाश वाणी, संतोष बिरारे, सलीम चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आता माघार नाही.. म्हणजे नाहीच.....

तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व प्रशासनाने ठेकेदारांना आश्वासन दिले होते. मात्र बँक खात्यावर बिलांची रक्कम जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली होती. आजही ही भूमिका कायम ठेवली. नवनियुक्त आयुक्त पांडे यांच्याकडूनही आश्वासन मिळाल्याने ठेकेदारांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.

Monday, December 9, 2019


औरंगाबाद अपडेटच्या माध्यमातून घाटी दवाखान्यात दिली व्हिल चेअर

फोटो-युवा सामना मिडिया न्युज नेटवर्क, औरंगाबाद
औरंगाबाद अपडेटच्या माध्यामातुन घाटी दवाखान्यात दिली व्हिल चेअर
रविवार 8 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये हे बरेच वर्षापासून औरंगाबाद अपडेट ने आपल्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध केल्या आणि घाटीतील कर्मचाऱ्यांचे काम व्यवस्थित न होत असल्यामुळे औरंगाबाद अपडेट ने पुढे येऊन स्वतः औरंगाबाद घाटी येथे आधुनिक व्हीलचेअरदान केले
साप्ताहिक औरंगाबाद अपडेटच्या वतीने घाटी दवाखान्यात रुग्णांच्या सुविधेसाठी एक व्हीलचेअर देण्यात आली. यावेळी संपादक जावेद पटेल, शेख कय्यूम, हसन शहा, मुजाहेद पटेल, अब्दुल अजीम इन्साफ, साजिद पटेल, नवीद पटेल, वहिद पटेल, अली शेरखान, सिद्दीक खान, अख्तर जमा खान, अल्ताफ हुसेन, अब्दुल अजीम व घाटी दवाखान्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.असे योगदानाची कामे करण्यासाठी समाजातून लोकांनी पुढे यावे असे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

Wednesday, December 4, 2019

*४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज*


मुंबई - राज्यातील सत्तानाट्य झाल्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. धारावी येथील ४०० शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. भ्रष्ट आणि विरोधी पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने हे कार्यकर्ते नाराज होते.

भाजपात सहभागी झालेले शिवसैनिक रमेश नाडार यांनी सांगितले की, शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेत अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. मागील ७ वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आहोत. निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणतं तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मतं मागितली होती अशा शब्दात रमेश नाडार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.  काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यापूर्वी रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 
अखेर औरंगाबाद महापालिकेला मिळाला आयुक्त
IAS Aastikumar Pandey With Wife IPS Mokshada Patil, SP, Aurangabad.
बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद मनपा आयुक्त पदी नियुक्ती, निपुण विनायक यांचे ठिव ठीकाण नाही.

औरंगाबाद/प्रतिनिधी- युवा सामना मिडिया न्युज-
महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक वारंवार सुट्टीवर जात असल्याने त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. पालिका पदाधिकाऱ्यासोबत खटकल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. दिवाळीपासून ते रजा टाकून निघून गेले ते शहरात परतले नाही. शेवटी बुधवारी (दि.४) शासनाने त्यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने हे आदेश जारी करण्यात आले असून पाण्डेय यांना तात्काळ पालिकेत रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आस्तिककुमार पांडे यांची फेब्रुवारी महिन्यात अकोला येथून बीडला बदली झाली होती. त्यांनी केलेल्या वाळू माफियाविरोधातील कारवाया, गौण खनीज वाहतूकीतील पारदर्शकता आणण्याच्या त्यांच्या  प्रयत्नामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले. त्याबरोबरच चला शहर घडवूया ही मोहीम जनतेत स्वच्छतेची व जबाबदारीची जागरूकता निर्माण करणारी ठरली. त्यांची आता औरंगाबाद येथील महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून यशदा प्रकल्पाच्या संचालिका प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली आहे.

तब्बल सव्वा महिन्यापासून रजेवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे पुन्हा शहरात येणाच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शहरातील विकासकामांबरोबरच पालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प झाला होता. शहरात असतानाही आयुक्त डॉ. निपुण हे पालिकेत फिरकत नाहीत. यामुळे आयुक्तांविषयी नागरिकांतून नाराजी तर नगरसेवकांविषयी रोष व्यक्त केला जात होता. यासंदर्भात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त म्हणून नवीन अधिकारी देण्याची मागणी केली होती. तसेच आमदार अंबादास दानवे यांचीही याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, बुधवारी (दि.४) सामान्य प्रशासन विभागाने डॉ. निपुण विनायक यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याने सव्वा महिन्यांत पालिकेला आयुक्त मिळाला आहे.

विकासकामांना गती मिळेल - महापौर घोडेले

महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्याने आता विकासकामे झपाट्याने होतील. अस्तिककुमार पांडे यांचे शहरात स्वागत आहे. पालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन हे समन्वय ठेऊन काम करीत आहेत. मात्र, पूर्णवेळ आयुक्त नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी पूर्ण केली. याबाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच यासाठी पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार यांचेही आभार व्यक्त करतो.

समस्यांना एकटे महापौर घोडेले भिडले

शहरात कचराकोंडी उद्भवल्यानंतर महापालिकेचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून राज्य शासनाने खास दिल्ली येथून डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेत पाठविले. कचरा प्रश्न आता सुटला असल्याचे पाहून ते गेल्या काही महिन्यांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. शहरात असूनही डॉ. विनायक हे पालिका मुख्यलयात कमी आणि संशोधन केंद्रात बसून कारभार चालवायचे. त्यात ते वारंवार सुट्टीवर निघून जात असल्याने कायम वादग्रस्त ठरले. याउलट महापौर नंदकुमार घोडेले यांनी जबाबदारीतून पळ न काढता येणाऱ्या सर्व समस्यांना एकट्याने तोंड दिले. डेंग्यूमुळे शहरात 11 जणांचे बळी गेले. अशा परिस्थतीत डॉ. विनायक हे रजा टाकून निघून गेले. मात्र, महापौरांनी एकट्याने अधिकऱ्यांच्या बैठक घेऊन त्यांना कामाला लावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत. त्यांचे आंदोलने, घेराव, निवेदने याला महापौर घोडेले एकटे सामोरे जात आहेत. मात्र, कर वसुलीसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष न दिल्याने अधिकात्यांचेही याकडे दुर्लक्ष राहिले. आता नवीन आयुक्त म्हणून अस्तिककुमार पांडे आले असल्याने पालिकेच्या तिजोरी भरले आणि शहरातील विकासकामे गतीने होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Thursday, November 14, 2019

धनादेश अनादरप्रकरणी उद्योगपतीला अटक

औरंंगाबाद : दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेले साईराम इंडस्ट्रीचे मालक सिध्दार्थ बागूल (रा.श्री.स्वामी समर्थ कॉलनी, सिडको महानगर) यांना गुरूवारी (दि.१४) गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. धनादेश अनादर प्रकरणी बागुल यांच्याविरूध्द मुंबईतील माझगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, जमादार गरड,भालेराव, बिडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------------------
यंत्रावर काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू

औरंंगाबाद : यंत्रावर काम करीत असतांना अचानकपणे यंत्राचा मार लागून सुभाष लक्ष्मण म्हस्के (वय २२, रा.धोंडखेडा) या कामगाराचा मृत्यू झाला. सुभाष म्हस्के हा गुरूवारी (दि.१४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयसीएल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे त्याच्या डोक्याला यंत्राचा जोरदार धक्का लागून तो बेशुध्द झाला. सुभाष म्हस्के याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.
----------------------------------------
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंंगाबाद : गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे राहणार्‍या शिला गोरख तिनगोटे (वय २४) या महिलेने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिला तिनगोटे हिने गुरूवारी (दि.१४) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिला तिनगोटेला उपचारासाठी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...