Thursday, November 14, 2019

आयुक्ताविना महापालिका ; जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश मिळेना

मनपा आयुक्त कोण ? महापौर घोडेले यांचा संतप्त सवाल

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीपासून सुट्टीवर गेल्याने काही दिवस जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला होता. मात्र, विनायक यांनी पुन्हा परस्पर रजा वाढवल्याने सध्या त्यांचा पदभार कोणाकडे सुपुर्द करण्यात आला याची माहिती मनपाला देण्यात आलेली नाही, एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सुधारित आदेश प्राप्त नसल्याचे सांगितल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त कोण? असा संतप्त सवाल महापौर घोडेले यांनी केला.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दिवाळीनिमित्त दहा दिवसाच्या सुटीवर गेले. आयुक्त सुटीवर गेल्यामुळे त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा आठ दिवसाची सुटी वाढवली. या वाढवलेल्या कालावधीसाठी आयुक्तांचा प्रभारी पदभार देण्याचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत समोर आले. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार असल्याने महापौरांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र पाठवले. सकाळी दहा वाजता बैठक सुरु होण्यापूर्वी महापौर घोडेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना बैठकीला यावे अशी सूचना केली. त्यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, आयुक्तांनी वाढविलेल्या सुटीच्या काळातील प्रभारी पदभार स्विकारण्यासंदर्भात कोणतेही आदेश   प्राप्त झालेले नाही, असे महापौरांना सांगितले. त्यांनतर महापौर घोडेले यांनी राज्याचे मुख्यसचिव अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी फोनव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोघांनीही फोन घेतला नाही. त्यामुळे महापौर घोडेले संतप्त झाले. मनपाचे आयुक्त कोण? असा सवाल त्यांनी केला.

प्रशासकीय प्रमुखही महापौरच ?

शहरातील रखडलेल्या कामांसाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या दालनात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस उपायुक्तांसह विभागप्रमुख उपस्थित होते. शंभर कोटीच्या रस्ता कामांचा आढावा घेतला. सिटीचौक ते सादिया टॉकीज पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सूरूवात होणार आहे. रस्त्यांची कामे करण्यासाठी चारही ठेकेदारांनी लॅब सुरु केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांची जमा असलेल्या अनामत रकमेतून प्रत्येकाचे अडीच लाख रूपये घेवून दहा लाख रूपयात लॅब उघडणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विशेष म्हणजे ही बैठक आयुक्ताविनाच पार पडली.


महापालिकेचा प्रशासकीय कारभार ठप्प

आयुक्तांच्या कार्यालयात प्रशासकीय मान्यतेसाठी अनेक महत्त्वाच्या संचिका पडून आहेत.  स्मार्ट सिटीतून होणारी स्मार्ट वॉटर, हेल्थ, ऐतिहासिक दरवाजे, रस्ते, शाळा या कामांच्या निविदा प्रक्रिया ठप्प आहे. घनकचरा प्रकल्पाचा सुधारित १४३ कोटीचा आराखडयास शासनाने मंजूरी दिली. त्याला मनपाची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. मात्र, अजूनही आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. हर्सुलची नव्याने निविदा काढण्यात आलेली नाही. उपभोक्ता कर लावण्याची निविदा काढण्यात आली नाही. मालमत्तांचे सर्वेक्षण करुन नव्याने कर लावला गेला नाही. मालमत्ता आणि घनकचरा विभागाचे अधिकारी बैठकीस नसल्याने मनपाच्या प्रशासनाची घडी विस्कळीत झाल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 
भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात ;
एक जण ठार दोन जण जखमी

औरंंगाबाद/प्रतिनिधी
समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जखमी झाले. हा अपघात गुरूवारी (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिकलठाणा गावाजवळ घडला. या अपघातात कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या हा देखील जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण नामदेव चव्हाण (वय २५,रा. म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना) असे मयत तरूणाचे नाव आहे. संजय शिवाजी चव्हाण (वय ३०,रा.म्हसला गाव रोड, ता.परतुर, जि.जालना), शेख रईस उर्फ बोक्या (रा.गरमपाणी परिसर, औरंगाबाद) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. श्रावण चव्हाण व संजय चव्हाण हे दोघे पडेगाव परिसरात राहणार्‍या बहिणीला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी आले होते. बहिणीला भेटून श्रावण चव्हाण, संजय चव्हाण हे दोघे परतुरला जात असतांना, त्यांना शेख रईस उर्फ बोक्या हा भेटला. त्यानंतर तिघेही दुचाकीवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने परतुरकडे जात होते.
दरम्यान, चिकलठाणा गावाजवळील पुलावर समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी चालविणार्‍या श्रावण चव्हाण याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाच्या खांबाला जावून आदळली. या अपघातात तिघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावण चव्हाण, संजय चव्हाण यांना उपचारासाठी घाटीत हलविले असता डॉक्टरांनी श्रावण चव्हाण याला तपासून मयत घोषीत केले. हा अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शेख रईस उर्फ बोक्या याने घटनास्थळावरून धुम ठोकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------------------
महिलेला चाकूने मारहाण; तीघांवर गुन्हा

औरंंगाबाद :  बचत गटाचे हप्ते भर सांगितल्याच्या कारणारुन दोन महिलांसह एका पुरुषाने ३५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करुन चाकुने मारहाण केली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जिन्सी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला व आरोपी महिला या एकाच बचत गटात आहेत. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेला बचत गटातुन घेतलेल्या कर्जाचे थकलेले हप्ते भरण्यास सांगितले. त्यारुन महिला आरोपीने बचत गटातील फिर्यादीसह इतर महिलांना शिवीगाळ केली. तसेच दोन आरोपी महिलांसह आरोपी शेख मेहराज याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करित तीच्या तोंडावर भाजी कापण्याच्या चाकुने वार करुन जखमी केले. तसेच यापूढे पैसे मागण्यासाठी आमच्या घरी कोणी आले तर त्यांना जीवे मारु अशी धमकी देखील दिली. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार नजन करित आहेत.
----------------------------------------
रस्त्यात अडथळा निर्माण करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई
विविध पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल

औरंंगाबाद : रस्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनधारक व हाथगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पोलिस ठाण्यात २५ जणांवर वाहतूकीस अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलीक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक अमोल विष्णु आहेरकर, सुनिल प्रेमसिंग राठोड, सोनु मोहण भगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक दिलीप लक्ष्मण पवार (२७, रा. मयुरपार्क), रोहन दिलीप नवगीरे (१९, रा. न्यायनगर, पुंडलीक नगर), अहेमद खान अब्दुल्ला खान (३६, रा. बारी कॉलनी), सय्यद खलील सय्यद हबीब (२१, रा. शरिफ कॉलनी, कटकटगेट), शेख साजीद शेख आमीर (३०, रा. नारेगाव) यांच्यावर, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळाची गाडा चालविणारे मझर खान समशेद खान (२८, रा. बेरीबाग, हर्सुल), जाव्ोद बनेमिया बागवान (२४), शेख नय्यर शेख इलियास (२२, दोघे रा. चिश्तीया कॉलनी, एन-६, सिडको), एजाज खान सुभान खान (३८, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्यावर तर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक प्रविण परमेश्वर शेडगे (रा. शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर नगर), किशोर साहेबराव राठोड (२२, रा. संयजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर तसेच उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळगाड्या लावणार्‍या अब्दुल अन्वर अब्दुल हमीद (५०), अक्तर अब्दुल करीम बागवान (५२, रा. दोघे रा. सब्जीमंडी, पैठणगेट), सर्जेराव किसन त्रिभुवन (६०, रा. मिलींदनगर) व रिक्षा चालक विजय देविदास दाभाडे (२७, रा. कोकणवाडी) यांच्यावर तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक विठ्ठल उत्तमराव हिरे (३८, रा. नारळीबाग), मुक्तार मलिक जाफर मलिक (४५, रा. गणेश कॉलनी), जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालक भरत रेतीलाल पाटील (२४, रा. नळठाणा ता. सिंद्दखेड जि. धुळे), सलीम खान अब्दुल रहेमान (२५, रा. रहीमनगर, आझाद चौक), लोडींग वाहन चालक शेख अब्दुल समद शेख अब्दुल गफुर (२४, रा. नाहीद नगर, हत्तेसिंगपुरा, कटकटगेट) तसेच जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक योगेश बबनराव रत्नपारखी (३५, रा. कैलास नगर) व अकबर खान वजीर खान पठाण (४०, रा. सादतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------
विवाहितेचा विनयभंग
औरंगाबाद : बसैय्ये नगर येथील मैदानाजवळील रस्त्याने पायी जाणार्‍या ३८ वर्षीय तक्रारदार विवाहीतेची छेड काढुन शेख फारख शेख हबीब (वय ४०, रा.बायजीपुरा) याने विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शेख फारुख याच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.
----------------------------------------
विभक्त राहणार्‍या महिलेवर लैंगिक अत्याचार

औरंंगाबाद : पतीपासून विभक्त राहणार्‍या ४२ वर्षीय महिलेवर देविदास रामचंद्र चव्हाण (वय ६०, रा.सुरेगाव, ता.येवला, जि.नाशिक) याने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिला एमआयडीसी वाळुज परिसरातील रहिवासी असून तिची ओळख देविदास चव्हाण याच्यासोबत २०१२ साली औरंगाबाद ते नाशिक प्रवासादरम्यान झाली होती. त्यानंतर देविदास चव्हाण याने पीडितेस लग्न करण्याचे तसेच तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून २०१२ ते ऑगस्ट २०१९ या काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देविदास चव्हाण याच्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.
----------------------------------------
भाडेकरूची माहिती न देणार्‍या घरमालकावर गुन्हा
औरंगाबाद : भाडेकरुची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली. शहरात काही अनुचित घटना घडु नये या करीता सर्व घर मालकांना किरायाने राहणार्‍या व्यक्तीची माहिती पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक केले असतांना देखील किरायदारांची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द कारवाई करणे सुरु आहे. त्यानुसार मुकुंदवाडी गावातील सदाशिव भिका फरकाडे (६०) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार मनगटे करित आहेत.
----------------------------------------
अल्पवयीन मुलाचे अपहरण
औरंगाबाद : हर्सुल येथील छत्रपती नगरात एका १७ वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्यची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. प्रकरणात अपह्त मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हुर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भागिले करित आहेत.
----------------------------------------
विविध भागातून दुचाकी चोरीला
औरंगाबद : घरा समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीजे-०२८२) चोरट्याने लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी बीड बायपास येथील सहारा कॉलनीत घडली. प्रकरणात साहेब खान नसिर खान (३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राठोड करित आहेत. तर
दुसऱ्या घटनेत टिव्ही सेंटर येथील जिजाऊ चौकात उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएफ-२८४३) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात विश्वभंर दिंगबर काथार (वय ४८, रा. सुरेवाडी, जाधववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जाधव करित आहेत.
----------------------------------------
चोराने रिक्षा लांबविली
औरंगाबाद : घरा समोरुन हॅन्डल लॉक करुन ठेवलेली रिक्षा क्रमांक (एमएच-२०-एए-५७७९) चोरट्याने चोरुन नेली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. प्रकरणात आनंदराव वामनराव देशमुख (वय ५२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख शकील करित आहेत.
----------------------------------------
हॉटेल मध्ये वीज चोरी
औरंगाबाद : महावितरण कंपनीची तब्बल २ लख ४७ हजार ८५३ रुपयांची वीज चोरी करुन तडजोडीची रक्क न भरल्याने रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल ग्रेट न्यु पंजाबच्या अनुपम रॉय याच्यासह तीन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पप्पू नवनाथ गोरे (२६, रा. गणेश नगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजेची चोरी करणार्‍या अनुपम रॉय यांच्यासह तीन महिलांवर विजचोरी केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वारे करित आहेत.
----------------------------------------
संशयीत फिरणारा गजाआड
औरंगाबाद : चोरी करण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत लपुन बसलेल्या अरबाज खान करीम खान (वय २२, रा. गरम पाणी, भोईवाडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकावजळ करण्यात आली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नसीम खान करित आहेत.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
लेखापरिक्षण अहवालातील आक्षेपांवर वर्षभरानंतरही अधिकारी खुलासे देईनात

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रकार उघडकीस

औरंगाबाद /प्रतिनिधी

महापालिकेच्या वर्षभरातील जमा-खर्च याचे लेखा परीक्षण करण्यात येते. यात आर्थिक नुकसान आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे अहवालात उघड होतात. मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी वर्षभरापूर्वी अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला आहे. त्यात अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही यासंबंधी कुठलीच कारवाई झाली नसल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१४) पार पडलेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. यासंबंधी कारवाई का झाली नाही ? असा सवाल सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी लेखापरीक्षण संबंधी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी उपलब्ध संचिकापैकी बहुतांश संचिकांचे परीक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर वाडकर यांनी महत्त्वाचा संचिका लेखापरीक्षणला उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे सांगत, महापालिकेचे झालेले नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मनपाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ कसे करायचे ? असा सवाल उपस्थित केला. यावर देवतराज यांनी अहवाल सादर करून एक वर्ष झाले. त्यावर आयुक्त निर्णय घेतील असा खुलासा केला. त्यानंतर आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी सध्या खुलासे घेण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा बैठकीत केला. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी दिले.
उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायमास लाईट बंद असून मनपा चे दुर्लक्ष.

हेच ते उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायलाईट बंद आहे व मनपा चे ह्याकडे दुर्लक्ष.

नुकताचगुजयंती साजरी झाली,आम दिवसात तर सोडाच गुरुनानक जयंतीत सुद्धा नगरसेवकाने काम केले नाही व महानगरपालिकेचे अधिकार्‍यांना जाग आली नाही.




Sunday, November 10, 2019

*राशेन व दुकान चालकावर होणार गुन्हा दाखल*
बर्‍याच ठिकाणी आसे होत आहे की राशन दुकान चालक कानाला कान लावून शासनाची दिशाभूल करून गोर गरीब जनतेला गहू,तांदुळ,दाळ,साखर,ईत्यादी वस्तु शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त दराने विक्री करत आहे.प्रत्येक गावातील राजकारण,दबाव,टाकून हमी भावाविरूध्द आवाज करणाऱ्या माणसाला डवचण्याचा प्रयत्न काही दुकानदार करीत आहेत,त्यामुळे प्रहार जन शक्ती संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला ञास झाला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत,यानंतर गोपनीय माहिती नुसार अधिकारी गावात येऊन प्रत्येक जनमानसाला हमी भावाविषयी माहीती विचारून पावती पेक्षा जास्त पैसे जर दुकान चालक घेत आसेल तर त्या दुकान चालकाविरुद्ध व शासनाने नेमलेल्या सचिवाविरूध्द गुन्हा दाखल होईल.तसेच दुकान चालक किती पैसे मागतात याची रेकॉर्ड करा तुमची माहीत खोपीनीय ठेवण्यात येईल. विनंती आहे प्रत्येक राशेन दुकान चालकाने दक्षता घ्यावी.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...