Sunday, August 25, 2019

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना......शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी  लाभदायक योजना*
          ही याेजना संपूर्ण देशात दि.9 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत.पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्यांची नोंदणी दि.9 ऑगस्ट 2019 पासून सुरूही करण्यात आली आहे.
*चला तर मग...या योजनेची वैशिष्ट्ये स्वतः समजून घेवू या आणि गरजू  शेतकऱ्यांना समजावूनही सांगूया...*

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

*ज्या शेतकऱ्यांनी वृद्धावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे,हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

*या योजनेंतर्गत सर्व पात्र व अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा रुपये 3000/- निश्चित पेन्शन देण्यात येईल.

*प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अंशदायी पेन्शन योजना आहे.

*या योजनेंतर्गत भारतीय जीवन विमा निगम द्वारा प्रवर्धित पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.

*या योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार वय वर्ष 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत.

*या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या दि.1ऑगस्ट 2019 रोजी च्या वयानुसार रक्कम रू.55/- ते रू.200/- प्रतिमाह मासिक हप्ता वयाच्या 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे.

*शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्ते इतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्याच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे.

*अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पती-पत्नी स्वतंत्रपणेही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात.

*त्यांच्या स्वतंत्र नोंदणी नुसार वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या दाेघांनाही स्वतंत्रपणे रुपये 3000/- प्रतिमाह मासिक पेन्शन मिळणार आहे.

*लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची सुद्धा तरतूद या योजनेत आहे.

*ज्या पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नाेंदणी केल्यानंतर काही कारणामुळे त्यांना या योजनेतून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा झालेली रक्कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल.

*या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्याचे सेवानिवृत्ती तारखेपूर्वी म्हणजेच वय वर्ष साठ वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वी आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या साठ वर्षे वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती किंवा पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या पती-पत्नी शेतकऱ्याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती-पत्नी शेतकऱ्याने पेन्शन फंडांमध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदार पती किंवा पत्नी शेतकऱ्यास मिळेल.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्यास पती किंवा पत्नी नसल्यास या शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह त्याच्या वारसदारास मिळेल.

*सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या शेतकर्‍याच्या पती किंवा पत्नीस दरमहा 50 टक्के म्हणजेच रुपये 1500/- पारिवारिक मासिक पेन्शन( कुटुंब निवृत्ती वेतन) मिळेल.

*या योजनेंतर्गत नोंद नोंदणीकृत शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभार्थी असल्यास त्याच्या संमतीनुसार पी एम किसान योजनेच्या लाभातून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा हप्ता रक्कम कपात करण्यात येईल.

*या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत http//:pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

*केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये तीस प्रति शेतकरी सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे.

*नोंदणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड,बँक पासबुक,मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात जाताना साेबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

*प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्रतेचे निकष:-*

*राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस कर्मचारी,राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्कीम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुविधा सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*कामगार आणि रोजगार मंत्रालय द्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेमध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेकरिता अपात्र असतील.

*उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थी प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील.

*जमीन धारण करणारी संस्था, संविधानीक पद धारण करणारी/ केलेली आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी मंत्री/खासदार/ आमदार/महापालिकेचे महापौर/ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष/केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी/शासन अंगीकृत संस्था/स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी-कर्मचारी/ चतुर्थ श्रेणी गट वर्ग 4चे कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती/नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर/वकील/ अभियंता/सनदी लेखापाल/ वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या याेजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील.

*तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणाऱ्या या याेजनेच्या लाभाकरिता  निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले आहे.*

*मनोज शिवाजी सानप*
*जिल्हा माहिती अधिकारी* *उस्मानाबाद*

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...