Monday, March 11, 2019

जयभवानी नगरात भाजप वॉर्ड अध्यक्षाची आत्महत्या
पोलिस ठाण्यांसमोर आमदारासह कार्यकर्त्यांचा ठिय्या

औरंंगाबाद/प्रतिनिधी  :  काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसह एका महिलेच्या त्रासाला कंटाळून भाजपा वॉर्ड अध्यक्षाने आत्महत्या केली. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. रविवारी रात्री ८.४० वाजता गल्ली क्र १४, जयभवानीनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, यात गुन्हा नोंदविण्यासाठी आ. अतुल सावे, नगरसवेक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यासमोर सोमवारी (दि. ११) सकाळी साडेअकरा वाजता तासभर ठिय्या दिल्याने ठाण्यात बराच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील प्रल्हाद पिंपळे ऊर्फ अहिरे (वय ४०, रा. गल्ली क्र. १४, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ, जयभवानीनगर) असे मृताचे नाव आहे. तर, छाया मनोहर लोखंडे (वय ३५, रा. राजनगर), जिजाबाई बाबुराव गव्हाणे (रा. शिवशक्तीनगर) आणि मोहन साळवे, अशी आरोपींची नावे आहेत. साळवे हे राजनगर-मुकुंदनगर (वॉर्ड क्र. ९०) च्या काँग्रेसच्या नगरसेविका अनिता साळवे यांचे पती आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छाया आणि जिजाबाई या माय-लेकी आहेत. मयत सुनील अहिरे हे वॉर्ड क्र. ९२ चे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष होते. त्यांची मागील सहा वर्षांपासून छाया लोखंडे हिच्यासोबत ओळख होती.

काही दिवसांपासून त्यांचे बिनसले होते. पैशांच्या देवाण-घेवाणीवरून त्यांच्यात वादही झाला होता. छाया ही त्यांना नेहमी त्रास द्यायची. त्यांच्या घरी येऊन भांडायची. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच सुनील अहिरे यांनी गळफास घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे. तर, जिजाबाई बाबूराव गव्हाणे, मोहन (नाना) यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करीत आहे. मी सुनील अहिरे, अशी सुसाईड नोट मुकुंदवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी मीरा अहिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक उद्धव जाधव करीत आहेत.

पोलिस व कार्यकर्त्यांत खडाजंगी

गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात आलेले आमदार अतुल सावे, नगरसेवक प्रमोद राठोड आणि पदाधिकारी यांची पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांच्याशी खडाजंगी झाली. गोंधळ करू नका, असे म्हणाल्यावरून आमदार आणि नगरसेवक तावातावाने जाब विचारत होते. अखेर, पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.



निष्पक्षपणे चौकशी करा - कल्याण काळे

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात काँग्रेस महिला नगरसेविकेच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी डॉ. कल्याण काळे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...