Monday, March 11, 2019

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सर्वोतोपरी सज्ज- जिल्हाधिकारी उदय चौधरी
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
औरंगाबाद। प्रतिनिधी ✒बेग मुश्ताक
 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी सर्व यंत्रणा संपूर्णपणे कार्यान्वित झालेल्या आहेत. निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रशासन,मतदारांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. चौधरी म्हणाले, निवडणूक कार्यक्रमाची 10 मार्च रोजी घोषणा झाली आहे. 28 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र चार एप्रिलपर्यंत सादर करता येतील. पाच एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रांची छानणी होईल. आठ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. 23 एप्रिल रोजी मतदान आणि 23 मे रोजी मतमोजणी होईल, 27 मेपर्यंत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपेल.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी  एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. जालना लोकसभा क्षेत्रात सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या एकूण नऊ विधानसभा क्षेत्रात 27 लक्ष 79 हजार 670 मतदार आहेत. त्यामध्ये 14 लक्ष 69 हजार 477 पुरुष, 13 लक्ष 10 हजार 169 महिला, तृतीय पंथी 24 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 30 ते 39 वयोगटातील सर्वाधिक मतदार म्हणजेच सहा लक्ष 71 हजार 924 मतदार असल्याचेही श्री. चौधरी यांनी सांगितले.
औरंगाबाद लोकसभेसाठी एकूण 18 लाख 57 हजार 645 मतदार आहेत. त्यामध्ये नऊ लक्ष 78 हजार 800 पुरूष, आठ लक्ष 78 हजार 827 महिला आणि 18 तृतीय पंथी  मतदार आहेत.
मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती व्हावी. मतदानाचा हक्क कसा बजावावा यासाठी बॅलट, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत मतदान पूर्व जागृती करण्यात आलेली आहे. निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रमाणात बॅलट, गुणक आणि व्हीव्हीपॅट यंत्र, मनुष्यबळ उपलब्ध आहे. अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र कोल्हापूरहून लवकरच येणार असल्याचेही श्री. चौधरी म्हणाले. 
मतदारांना निर्भय, नि:पक्ष आणि  पारदर्शक वातावरणात मतदान करण्यासाठी जागृती मोहीम राबविण्यात आलेली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक पाणी, वीज, मोबाईल कव्हरेज सेवा आदींची व्यवस्था केलेली आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येक ठिकाणी फ्लाईंग स्क्वाड, FST, व्हीडिओ चमू, दारू, रोकड, प्रतिबंधित औषधांची  तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आलेली आहेत, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.
नवतंत्रज्ञानाचा वापर
जिल्ह्यात 250 केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांकरिता मतदानासाठी आवश्यक सुविधेकरिता PWD ॲप, राजकीय पक्षांना आवश्यक परवानगीसाठी Suvidha, आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकां साठी CVigil  आणि तक्रार निवारणासाठी  Samadhan ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांच्या गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या सोडवणुकीसाठी 1950 हा टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यंत्रणांची नजर
 आदर्श निवडणूक आचारसंहितचे  पालन व्हावे, या दृष्टीकोनातून सर्व यंत्रणांबरोबरच सामाजिक माध्यमांतून होणाऱ्या राजकीय जाहिरातींवर पोलिस विभागाची नजर असेल. संपत्ती विद्रूपीकरणावरही कार्यवाही सुरूच आहे. राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरणासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणिकरण  व सनियंत्रण समिती स्थापन आहे. आयोगाच्या सूचनांनुसार काटेकोरपणे या समितींमार्फत पालन करण्यात येणार असल्याचेही श्री. चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...