Friday, February 14, 2020

*उध्दवजी मंत्रालय नक्की जनतेचे की वशिल्याच्या तट्टूंचे  ?*
युवा सामना मिडिया विशेष लेख(बेग एम.एन.)

      राज्याचा कारभार जिथून चालतो, नियंत्रीत केला जातो ते मंत्रालय नक्की कुणाचे आहे ? सामान्य जनतेचे की वशिल्याच्या तट्टूंचे ? हा प्रश्न मंत्रालयात गेल्यावर अनेकवेऴा पडल्याशिवाय रहात नाही. मंत्रालयाच्या दारावर गेल्या गेल्या पहिलीच पाटी वाचायला मिऴते ती म्हणजे सामान्य जनतेसाठी दुपारी दोन नंतर प्रवेश. मंत्रालय सकाऴी सुरू होते दहाला आणि सामान्य जनतेला प्रवेश दुपारी दोनला. सकाऴी आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि या सर्वांच्या वशिल्याच्या तट्टूंनाच प्रवेश दिला जातो. म्हणजे जे व्हीआयपी आहेत त्यांनाच प्रवेश दिला जातो. राज्याच्या काना-कोपर्यातून आलेला सामान्य माणूस दुपारी दोन वाजेपर्यंत मंत्रालयाच्या भव्य इमारतीकडे आशाऴभूत नजरेने पाहत राहतो. त्याच्यासमोर अनेक व्हीआयपी, वशिल्याचे तट्टू आत जातात, बाहेर येतात पण गेटवरचे पोलिस त्याला गेटजवऴही थांबू देत नाहीत. तो गेटवर आला की तिथून त्याला हुसकावून लावले जाते. त्याने तिथं उभं राहून मंत्रालयाकडे पहायचेही नाही. त्याची तेवढीही लायकी नाही. तो तिथे आला की खाकीतले बाबू अंगावर येतात. कुत्रे हाकलतात तसे त्याला हाकलतात. लोकांनी कामासाठी गावाकडून आदल्या दिवशी यायचे. ना जेवायची सोय ना रहायची सोय. फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर वेऴ काढायचा. रेल्वे स्टेशनवरील शौचालयात अंघोऴ करायची. रस्त्यावरच वडा-पाव किंवा कायतरी खायचे आणि सका-सकाऴी मंत्रालय गाठायचे. तिथे गेल्यावर पास काढायला रांगेत उभे रहायचे. रांगही अशी की डोक्यावर छत्र नाही. भर उन्हात होरपऴत उभे रहायचे. त्या रांगेत उभं राहून पास काढला अन गेटवर गेले की तिथे थांबवले जाते. तुम्हाला आत्ताच नाही दुपारी दोन नंतर सोडले जाईल म्हणून गेटवरचा पहारेकरी आदेश देतो. परत झकमारत आणि ताटकऴत तिथेच कुठेतर थांबावे लागते. गेटजवऴ नाही थांबायचे कारण कँमेर्यात आतल्या साहेबांना दिसते आणि मग ते पहारेकर्यांना शिव्या घालतात म्हणे. म्हणून ते कुत्रे हाकलल्यासारखे लोकांना हाकलतात. त्यामुऴे गेटपासून काही अंतरावर आशाऴभूत आणि हतबल मानसिकतेने जनता ताटकऴत बसते. या मंत्रालयाचा मालक असलेली जनता रोज मंत्रालयाच्या दारातच विटंबीत होते, अपमानित होते. याची खंत कुणालाच वाटत नाही हे विशेष.

     सामान्य जनतेला सकाऴी मंत्रालय सुरू होतानच प्रवेश दिला गेला पाहिजे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्याला नमस्कार करून, सलाम ठोकून प्राधान्याने आत घेतला पाहिजे. कारण तोच त्या मंत्रालयाचा खराखुरा मालक आहे. बाकी आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी हे त्याचे नोकर आहेत. नोकरांनीच मालकाच्या संपत्तीवर कब्जा केला आहे. नोकरच मालक झाले आहेत. सामान्य माणसाला मंत्रालायात दुपारी दोनला प्रवेश देण्यात येतो. पण आत आल्यावर त्याला ज्या टेबलला पोहोचायचे आहे तिथवर जाईपर्यंत पाच वाजतात. या माऴ्यावरून त्या माऴ्यावर आणि या टेबलवरून त्या टेबलवर त्याला कोलले जाते. मुऴात जिथे काम आहे ते कार्यालय आणि तिथले साहेब भेटणे म्हणजे मटक्यातला जँकपॉट लागण्यासारखे आहे. वेऴेत कार्यालय सापडले तर आतले बाबूराव जेवायला सुटलेले असतात. जेवण केल्यावर थोडसं इकडे-तिकडे, मग लघूशंकेला, तोवर चहाची वेऴ होते. चहाची वेऴ झाली की थोड्या वेऴाने सुट्टी होते. साहेब घरी जायच्या तयारीला लागतात.  आपलं काम घेवून आलेला माणूस वाट पहात बसलेला असतो. आपलं काम कधी होणार ? या विवंचनेत थांबलेल्या माणसाला उद्या येता का ? म्हणून सांगितले जाते. जिथं एक दिवस थांबायची औकाद नाही तिथे दुसरा दिवस कसा काढायचा आणि कुठे काढायचा ? हा आक्राऴ-विक्राऴ प्रश्न असतो. पण सामान्य माणूस या सगऴ्या कात्रीतून प्रवास करतो. काही अधिकारी चांगले आहेत. माणूसकीला जपणारे आहेत. समोरच्या माणसाला समजून घेतात. स्वत:चे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा जपणारे असतात. समोरच्याचे दु:ख जाणून घेत, अडचण समजून घेत तत्परतेने काम करतात. पण काही अधिकारी या पठडीत मोडत नाहीत. त्यांना एकतर आमदार-खासदार आणि मंत्र्याची शिफारस लागते किंवा हात ओले करून दिले तरच कागद पुढे सरकतो, अन्यथा नाही. काम टाऴण्यासाठी तारीख पे तारीख सुरू करतात. अनेक कुरापती काढून काम टाऴले जाते. हे आणा, ते आणा असे सांगून समोरच्या माणसाला कोलले जाते. हेलपाटे मारायला लावले जातात. हे मंत्रालयातलं विदारक वास्तव आहे. त्यामुऴे मंत्रालय नक्की कुणाचं ? हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.

           लोकशाहीत लोक मालक असतात. पण ही मालकी आहे ती फक्त संविधानात आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकातच. वास्तव यापेक्षा वेगऴे आहे. वास्तवात लोक लाचार, मजबूर आणि हतबल आहेत. त्याला कुणी वाली नाही, त्याला कुणी धनी नाही. नेते मंडऴी निवडणूका होईपर्यंतच लोकांच्यापुढे झुकतात, वाकतात. त्यांना नमस्कार करतात. त्याला राजा म्हणतात. पण  निवडणूका झाल्या की या राजाला भिकेला लावतात. हेच इथले वास्तव आहे. सामान्य माणूस जर राजा असता, मालक असता तर तो रोज असा अपमानित झाला नसता. त्याची रोज अशी फजिती झाली नसती. मंत्रालयातच नव्हे तर प्रत्येक सरकारी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी त्याला ताटकऴत ठेवले नसते. त्याची वेऴ दुपारनंतरची ठेवली नसती. लोकशाहीत मालक असलेल्या जनतेची ही क्रुर चेष्टा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांनी ही बाबूशाही मोडीत काढावी. त्यांनी सामान्य जनतेला न्यायाची व सन्मानाची वागणूक द्यावी. बाबूशाही मोडीत काढून लोकशाहीला पुरक काम करावे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी लोकाभिमुख काम केले. त्यांना लोकांनी डोक्यावरही घेतले आहे. तसे लोकाभिमुख काम करण्याची संधी उध्दवजी यांना आहे. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा लोकाभिमुख करावी. लोकांची गैरसोय होणार नाही याची काऴजी घ्यावी. केवऴ मंत्रालयच नव्हे तर सर्व सरकारी कार्यालयातील अशा पाट्या काढून टाकाव्यात. सामान्य माणसाला कार्यालय सुरू झाल्या-झाल्या प्रवेश द्यावा. कुणी कितीही मोठा साहेब असला तरी तो जनतेपेक्षा मोठा नसतो. तो जनतेचा नोकर असतो. त्याने कार्यालयात येणार्या सामान्यातल्या सामान्य माणसाला अदबीने भेटले पाहिजे. त्यांच्याशी अदबीने बोलले पाहिजे. त्याची सन्मानाने विचारपुस करत त्याचे काम केले पाहिजे. खरेतर त्याला सलामच ठोकला पाहिजे कारण तो मालक असतो. लोकशाहीत जनता मालक आहे. मालकाचा रूबाब असायला हवा पण इथे नोकरांचा रूबाब आहे. इथल्या व्यवस्थेने मालकाला लाचार केले आहे. त्याची अवस्था दऴभद्री करून ठेवली आहे. मंत्रालयातच लोकशाही हूतात्मा होते. तिचा मुडदा पाडला जातो मग ती राज्यात इतर ठिकाणी कशी जीवंत राहणार ? हा महत्वाचा प्रश्न आहे.

हयावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे व जनतेला न्याय देण्याचे काम करावे,असे आव्हान जनतेकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...