Saturday, January 15, 2022

हज हाऊस यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूट वाचवण्यासाठीचा लढा आणखी तीव्र करण्याची आवश्यकता .

हज हाऊस ही संस्था प्रामुख्याने हज यात्रेकरूंसाठी निवासाची सोय व्हावी या उद्देशाने बांधण्यात आली होती. पूर्वी दळणवळणाची साधने मोजकीच असल्याने आणि हज ला जाताना मुंबई सारख्या शहरात यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून हज हाऊस ची अठरा मजली इमारत उभी राहिली.पण कालांतराने महाराष्ट्रात औरंगाबाद आणि देशात इतर ठिकाणी देखील प्रादेशिक हज हाऊस ची निर्मिती झाल्याने आणि दळणवळणाची साधने वाढल्यानंतर मुंबई हज हाऊस वरील ताण हा मोठ्याप्रमाणात कमी झाला आहे.
तसे ही मुंबई हज हाऊस च्या इमारतीत हज काळातील एक महिनाच वर्दळ असते आणि वर्षाचे उर्वरित 11 महिने ही इमारत मोकळी असते. 2006 साली मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक - आर्थिक - शैक्षणिक स्थितीची माहिती देणारा सचर समिती अहवाल प्रकाशित झाला . यात मुस्लिम समुदायातील उमेदवार IAS , IPS, IFS , IRS सारख्या केंद्रीय शासकीय सेवेत कमी असल्याचे निदर्शनास आले , म्हणून मुस्लिम समुदायातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेतील टक्का वाढावा या उद्देशाने मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हज हाऊस येथे 2009 साली यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आली. आणि उर्वरित 11 महिन्यात या इमारतीच्या 18 मजल्यांपैकी 3 मजल्यांमध्ये निवासी प्रशिक्षण सुरू झाले. सुरुवातीला पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने केवळ 50 विद्यार्थ्यांसाठीच निवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. आणि ही प्रथा पुढे तत्कालीन प्रशासकांच्या उदासीन वृत्ती मुळे आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे तशीच सुरू राहिली. हज चा महिना वगळता उर्वरित 11 महिने हे कर्मचारी हज हाऊस ला स्वतःची मालकी ची वास्तू म्हणून वापरतात. त्यांचे नातेवाईक मुंबई पर्यटनासाठी आल्यावर किंवा आखाती देशात जाण्यासाठी हज हाऊस चा वापर निवासासाठी करतात. 2017 साली आलेले सीईओ हे दूरदृष्टी आणि विकास प्रेमी होते. त्यांनी पूर्वी 50 विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा 200 विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या. हज हाऊस च्या रिकाम्या राहणाऱ्या इमारतीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला. मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची गरिबीची परिस्थिती पाहून मेस वर सबसिडी देणे सुरू केले.केवळ ₹2700/महिन्यात मुंबई सारख्या खर्चिक ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळू लागले.सीईओ यांना या गोष्टीची कल्पना होती की यूपीएससी सारखी खडतर परीक्षा एका वर्षात पास होणे शक्य नाही त्यामुळे त्यांनी निवडक , आश्वासक आणि मेहेनती सीनिअर विद्यार्थ्यांना पुन्हा हज हाऊस येथे अभ्यास करण्याची संधी दिली. त्यामुळे नवीन आणि सीनिअर विद्यार्थ्यांचा सुरेख मिश्रण होऊन पूर्वी पेक्षा कित्येक पटीने हज हाऊस च्या यशाचा आलेख वाढला. पण तेथील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांचे राहणे खटकू लागले , कारण त्यांच्या विलासाची आणि पर्यटनाची सोय बंद झाली आणि हज हाऊस चा वापर विधायक कामासाठी होऊ लागला.त्यांनी नवीन सीईओ वर दबाव आणून आणि कट कारस्थाने रचून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व सुविधा बंद पाडल्या. 2021 च्या पूर्वपरीक्षे साठी केवळ 8 दिवस राहिले असताना मुलांचे पिण्याचे पाणी बंद करण्यात आले , त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला.यामुळे परीक्षेच्या पूर्वी 70 पेक्षा जास्त विद्यार्थी आजारी पडले. नवीन सीईओंनी देखील उदासीनता दर्शवत विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेण्यास आणि धोरणे आखण्यास सुरुवात केली आणि सर्व सीनिअर विद्यार्थ्यांना हज हाऊस मधून काढून टाकले. सीनिअर विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्यावर आणि जनतेच्या दबावामुळे सीईओनी 50 विद्यार्थ्यांच्या ऐवजी 100 विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022 साठी निवडले आहेत. पण हे सर्व नवीन विद्यार्थी आहेत.त्यांनी आकडा वाढवला हे निश्चित स्वागतार्ह आहे पण बाकी चे प्रश्न अजूनही जैसे थे आहेत . उदा. - सिनिअर विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्याबद्दल कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नाही. - जे विद्यार्थी मेन्स लिहित आहेत त्यांना देखील हज हाऊस सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यांना हज हाऊस मध्ये पुढच्या तयारी साठी ठेवण्याबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही . - पूर्वी मिळणारी मेस सबसिडी अजून चालू झालेली नाही . आज हे सर्व होतकरू , मेहनती सीनिअर विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी आश्रय शोधत आहेत, काही यूपीएससी सोडण्याच्या विचारात आहेत. भारताच्या सेवेसाठी घडणारे हे भविष्यातील अधिकारी आज स्वतःच्या हक्कासाठी वन वन भटकत आहेत. हज हाऊस हे समाजाचे भांडवल आहे आणि समाजाने हे ठरवायचे आहे की या इमारतीचा उपयोग समुदायाची भविष्यातील पिढी घडवण्यासाठी उपयोगात आणायची आहे की काही मूठभर कर्मचाऱ्यांच्या विलासी वृत्ती साठी खर्ची घालायची आहे..? एकीकडे गळा काढायचा की मुस्लिम समुदायातील मुले शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येत नाहीत आणि दुसरीकडे जे मुस्लिम मुले आपले जीवाचे रान करून अभ्यास करत आहेत त्यांना असे त्रास द्यावा का ...? जसा आपल्या दलीत बांधवांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे यासाठी संघर्ष केला नमांतरासाठी लढा लढला तसाच व्यापक लढा मुस्लिम समाजाला आपल्या हक्काचे हज हाऊस आपल्या मुलाच्या भविष्यासाठी वापरले जावे यासाठी लढवा लागेल...

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...